पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या आठवड्यात १,२८७ वाहनचालकांना सुमारे सव्वा नऊ लाखांचे ई-चलन पाठवून दंडात्मक कारवाई केली आहे.

‘विमानतळ वाहतूक पोलिसांसी ६ जुलैपासून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. १२ जुलैपर्यंत वाहतूक पोलिसांनी १,२८७ वाहनचालकांवर कारवाई केली. या वाहनचालकांना ९,३६,६५० रुपयांचे ई-चलन पाठविण्यात आले आहे. यापैकी एक लाख ३ हजार ६५० रुपये वसूल केले आहेत,’ अशी माहिती विमानतळ वाहतूक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली.

‘पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आणि परिसरात मॉल, निवासी संकुले, नर्सरी आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची दुकाने, पंचतारांकीत हॉटेल असल्याने या परिसर गजबजलेला असतो. कॅबचालक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून थांबलेले दिसतात. परिणामी वाहतूक कोंडी होत होते. प्रत्येक रस्त्यांवर सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तीन टप्प्यांत दोन वाहतूक कर्मचारी नेमण्यात आले आहेत. रस्त्यावर गाडी थांबलेली दिसताच वाहनचालकावर ई-चलनाची दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे,’ असे कदम म्हणाले.

दिवसात दीडशेहून अधिक ‘कॅब’वर कारवाई

वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या कडेला बेकायदा उभे राणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक कॅबचालकांचा समावेश असून १५९ कॅबचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कदम यांनी देत, ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ऑगस्टपर्यंत एआय आधारित सीसीटीव्ही’

बेकायदा पार्क केलेल्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि दंड करण्यासाठी विमानतळ अधिकारी, वाहतूक पोलिस आणि एअरोमॉल अधिकाऱ्यांच्या समन्वयाने, नवीन विमानतळ रस्ता आणि अतिमहत्त्वाच्या (व्हीआयपी) व्यक्तींसाठी असलेल्या (सिम्बायोसिस कॉलेज रोड) रस्त्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावार आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत या परिसरातील रस्त्यांवर तीन ते चार कॅमेरे बसविण्यात येण्याची शक्यता आहे, असे विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.