‘देशात विद्यापीठे ८०० आहेत, मात्र आंतरविद्यापीठीय संशोधन संस्था अवघ्या तीनच आहेत. त्यांची संख्या वाढवण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येतील. मात्र त्यासाठी आपल्या विद्यापीठांमध्ये आधी पुरेशा पायाभूत सुविधाही उभाराव्या लागतील,’ असे मत केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी व्यक्त केले.

‘आयुका’, ‘विद्यापीठ अनुदान आयोग’ यांच्यातर्फे ‘शोध, शिक्षा आणि समिक्षा’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी जावडेकर बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी आंतरविद्यापीठीय संशोधन संस्थांची गरज, त्यांची भूमिका मांडून कार्यशाळेची सुरूवात केली. या वेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष व्ही. एस. चौहान उपस्थित होते. देशातील जवळपास दोनशे विद्यापीठांचे कुलगुरू, प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

जावडेकर म्हणाले, ‘आंतरविद्यापीठीय संशोधन संस्थांची अधिकाधिक उभारणी करण्याची गरज आहे. सध्या बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये नॅनो तंत्रज्ञानावर संशोधन करण्यासाठी जगातील जवळपास ६४ विद्यापीठांमधील विद्यार्थी येतात. हेच या संशोधन केंद्रांचे उद्दिष्ट आहे. संशोधनाबरोबरच उच्च शिक्षणाची पद्धतही बदलत आहे.

त्यासाठीच ‘स्वयम’सारखे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून ४०० पेक्षा अधिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

गेल्या दीड महिन्यात स्वयमच्या माध्यमातून २ लाख ३० हजार विद्यार्थ्यांना विविध विषयांचे शिक्षण देणे शक्य झाले आहे.

नवे केंद्र बनारस हिंदू विद्यापीठात 

बनारस हिंदू विद्यापीठामध्ये शिक्षक प्रशिक्षण आणि संशोधनावर काम करणारे आंतरविद्यापीठीय संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. व्ही. एस. चौहान यांनी दिली. त्याचबरोबर देशात मोठय़ा प्रमाणावर उभ्या राहणाऱ्या खासगी विद्यापीठांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांना संशोधन प्रक्रियेत सामावून घेण्याची गरज असल्याचेही डॉ. चौहान यांनी नमूद केले.