पुणे : राज्यातील १ लाख १० हजार ६३१ अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार अंगणवाडीतील ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी आधारशिला बालवाटिका १, आधारशिला बालवाटिका २, आधारशिला बालवाटिका ३ या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, अंगणवाडीसेविकांना अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात शालेय स्तरावर राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवण्यात येत आहे. त्यात पहिलीला नवा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात ३ ते ६ वयोगटासाठीच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाचाही पायाभूत स्तर म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे खेळ गट, छोटा गट, मोठा गट या पूर्वप्राथमिकच्या वर्गांसाठीही अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
राज्यात महिला आणि बालविकास विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या १ लाख १० हजार ६३१ अंगणवाड्यांमध्ये ३० लाख मुलांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम, तसेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेला पायाभूत स्तर अभ्यासक्रम राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाचे नाव ‘आधारशिला बालवाटिका १’, ‘आधारशिला बालवाटिका २’, ‘आधारशिला बालवाटिका ३’ असे आहे.
अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (एमआरएसएसी) या संस्थेने विकसित केलेल्या मोबाइल ॲपद्वारे राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महिला व बालविकास विभागाकडील सर्व अंगणवाड्यांचेही जिओ टॅगिंग करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अंगणवाड्यांचे स्थानांतर
‘राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या अतिरिक्त वर्गखोल्यांमध्ये अंगणवाडी केंद्रांचे स्थानांतर करण्याबाबत महिला व बालविकास विभाग, शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना १४ मार्च रोजीच्या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या अतिरिक्त वर्गखोलीमध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थानांतर करण्याबाबतची कार्यवाही करावी,’ असे निर्देश देण्यात आले आहेत.