पुणे : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रेरणेतून न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथे ‘रोज एक प्रश्न खगोलशास्त्राचा’ हा अनोखा उपक्रम ऑक्टोबर २०१८मध्ये सुरू करण्यात आला. गेली साडेसहा वर्षे सातत्याने हा उपक्रम सुरू असून, आतापर्यंत या उपक्रमात २४००हून अधिक प्रश्न विचारले गेले आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील तारांगण १९५४मध्ये सुरू झाले. उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी या तारांगणासाठी देणगी दिली होती. शाळेच्या सर्वांत वरच्या भागात या तारांगणाची उभारणी करण्यात आली. शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्पिट्झ’ या कंपनीने तारांगणाची यंत्रणा तयार केली होती.
विशेष म्हणजे या कंपनीची यंत्रणा असलेले आणि सुरू असलेले हे देशातील एकमेव तारांगण आहे, अशी माहिती शाळेतील विज्ञान शिक्षक विनायक रामदासी यांनी दिली. डॉ. नारळीकर यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेतील सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्राचा अभ्यासक्रमही राबवण्यात येतो. त्यात विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राविषयी माहिती देण्यासह दुर्बिणी वापरण्याबाबत शिकवण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.
रामदासी म्हणाले, ‘डॉ. नारळीकर यांनी शाळेतील तारांगणाला दोन वेळा भेट दिली होती. त्यात १९५७मध्ये त्यांनी पहिल्यांदा तारांगण पाहिले होते. तर २०१४मध्ये तारांगणाला ६० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने डॉ. नारळीकर यांनी पुन्हा तारांगणाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला होता. त्यांच्याच प्रेरणेतून ‘रोज एक प्रश्न खगोलशास्त्राचा’ हा उपक्रम ऑक्टोबर २०१८मध्ये सुरू करण्यात आला होता. हा उपक्रम आजही राबवण्यात येत आहे. आतापर्यंत या उपक्रमात २ हजार ४००हून अधिक प्रश्न विचारले गेले आहेत. त्याला विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली आहेत.’
तारांगण आता वातानुकुलित
शाळेतील तारांगण आता वातानुकुलित करण्यात आले आहे. शाळेतील १९७०च्या तुकडीने दिलेल्या देणगीतून वातानुकूलन यंत्रणा नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहे, असेही रामदासी यांनी सांगितले.