पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) प्रशासनाने नवीन नियमावली तयार केली आहे. त्यानुसार नियमांचे पालन न करणाऱ्या बसचालक आणि वाहकांना तत्काळ दोन हजार रुपयांचा दंड आणि पुन्हा गैरवर्तन केल्याचे आढळल्यास निलंबित केले जाणार आहे.
बेशिस्त बसचालक आणि वाहकांमुळे शहरात वाहतूक कोंडी आणि अपघात हाेत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच थांब्यांवर बस न थांबवणे, अचानक वेग वाढवणे किंवा कमी करणे, चुकीचे वळण घेणे, वाहतूक नियंत्रण दिव्यांचे (सिग्नल) पालन न करणे यांसारखे प्रकार होत असल्याने सेवेवर परिणाम होत आहे.
याबाबत विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बस चालक आणि वाहकांना तत्काळ दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास निलंबित करण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बसचालक आणि वाहकांकडून गैरवर्तनाबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याचा परिणाम वाहतूक सेवेवर होत आहे. त्यामुळे कठोर नियमावली बनविण्यात आली आहे. – सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी
नियमावलीत काय?
– नियमांचे पालन न केल्यास दोन हजार रुपयांचा दंड
– पुन्हा गैरवर्तन केल्याचे आढळल्यास निलंबन
– वाहनचालकांनी गाडी चालवताना मोबाइल फोनवर बोलू नये
– बसमध्ये किंवा बसजवळ धूम्रपान करण्यास मनाई
– थांब्यांवरच बस उभी करणे
– वाहतूक नियंत्रक दिव्यांचे पालन करणे – अति वेगाने वाहन चालविल्यास कारवाई