रेल्वे स्थानकावर येणाऱ्या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्या पार्किंगसाठी एसटी स्थानकाच्या मागे नवी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक विशाल अगरवाल यांनी दिली. रेल्वे स्थानकाच्या आवारात इतर वाहनांना अडथळा करणाऱ्या वाहनचालकांना यापुढे रेल्वेकडून दंडाची आकारणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अगरवाल यांची मुंबई येथे रेल्वेच्या मुख्यालयात बदली झाली असून, त्यांच्या जागेवर सुनीत शर्मा हे रुजू होणार आहेत. या पाश्र्वभूमीवर पुणे विभागातील कारकिर्दीचा आढावा घेण्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत अगरवाल यांनी ही माहिती दिली. अगरवाल म्हणाले की, स्थानकासमोरील पार्किंगचा भार कमी करण्यासाठी नवीन पार्किंग निर्माण करण्यात येणार आहे. एसटी स्थानकाच्या मागे आरपीएफच्या कार्यालयाजवळ सुमारे पाच हजार चौरस मीटर जागेवर पार्किंग उभारण्यात येईल. स्थानकातून बाहेर पडण्याच्या मार्गामध्ये बदल करण्यात येणार असून, स्थानकातील मार्गावर वाहन लावून अडथळा करणाऱ्यांवर यापुढे रेल्वेकडून दंडाची आकारणी केली जाईल.
…आणखी चार सरकते जिने
पुणे स्थानकासाठी आणखी चार सरकते जिने मंजूर झाले असून, येत्या काही दिवसांत हे जिने स्थानकावर लावण्यात येणार आहेत. फलाट क्रमांक एक ते तीनला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम काही दिवसांत सुरू होईल. त्याशिवाय सर्व फलाटाला जोडणाऱ्या मोठय़ा पादचारी पुलाचेही नियोजन करण्यात आले आहे. रविवारी दुपारनंतरही तिकिटांचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे. चिंचवड स्थानकावही तशी व्यवस्था देण्याचा विचार आहे. त्याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणावर जन साधारण तिकीट बुकिंग सेवक नेमण्यात येणार असून, त्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहनही अगरवाल यांनी केले.
पुण्यातील कारकिर्दीबाबत ते म्हणाले की, पुणे विभागात काम करण्याचा अनुभव चांगला आहे. माझ्या कारकिर्दीत स्थानकावरील स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले. सहा क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढविली. त्याचप्रमाणे पादचारी पूल, पार्किंग आदी विविध प्रश्न मार्गा लागत आहेत.
स्थानकावरील सीसीटीव्ही यंत्रणा बदलणार
सध्या स्थानकावर कार्यरत असलेली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा बदलण्यात येणार आहे. त्यासाठी ४४ कॅमेऱ्यांची नवी यंत्रणा रेल्वेकडून मंजूर करण्यात आली आहे. नवी यंत्रणा अत्याधुनिक असणार आहे, अशी माहिती विशाल अगरवाल यांनी दिली. सध्या स्थानकावर ३४ कॅमेरे लावण्यात आले आहे. नव्या यंत्रणेसाठी हे कॅमेरे काढण्यात येणार आहेत. काढलेले हे कॅमेरे शिवाजीनगर व कोल्हापूर स्थानकात लावण्यात येतील.