पुणे : कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर पश्चिम घाटात असलेल्या तीन देवरायांमधून गोगलगायीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. ही प्रजाती देवराईमध्ये आढळल्याने या प्रजातीचे नामकरण ‘डायक्रॅक्स देवराईवासी’ असे करण्यात आलेले असून, ही प्रजाती आकाराने ५ मिलिमीटरपेक्षा लहान आहे.

दहिवडी महाविद्यालयातील डॉ. अमृत भोसले, ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील डॉ. ओमकार यादव यांचा या संशोधनात सहभाग आहे. गोगलगायीच्या नव्या प्रजातीचे तपशील असलेला शोधनिबंध ‘जर्नल ऑफ कॉन्कोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील आंबा या गावातील आंबेश्वर देवराई, पाटगावजवळील श्री स्वयंभू मंदिर देवराई आणि गगनबावड्याजवळील तळये गावातील गंगोबा देवराई येथील पालापाचोळ्यांत ही प्रजाती आढळली.

डायक्रॅक्स कुळातील गोगलगायी त्यांच्या छोट्या आकारावरून, शंखाच्या बाहेर आलेल्या श्वसननलिकेवरून आणि शंखावरील रेघांच्या रचनांवरून वेगळ्या ठरतात. नव्याने शोधलेली गोगलगाय प्रजाती तिच्या शंखावरील रेघांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे त्या कुळातील इतर गोगलगायींपेक्षा वेगळी ठरते. या प्रजातीमधील गोगलगायी आकाराने ५ मिलिमीटरपेक्षा लहान आहेत. मान्सूनचा काळ हा या गोगलगायींच्या सक्रिय असण्याचा काळ आहे. रात्रीच्या वेळी या गोगलगायी जमिनीवर पडलेल्या पानांवर, तर दिवसा त्या पाल्याखाली असणाऱ्या मातीमध्ये विसावलेल्या आढळतात, असे डॉ. यादव यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवरायांची जैवविविधता अधोरेखित

‘सह्याद्रीमधील अनेक गावांनी देवरायांचे जतन करून मानवी हस्तक्षेप होऊ दिलेला नाही. त्यामुळे या जागांवरील समृद्ध जैवविविधता टिकून आहे. नव्याने शोध लागलेल्या गोगलगायीमुळे देवरायांनी जपलेली जैवविविधता अधोरेखित झाली आहे,’ असे डॉ. ओमकार यादव यांनी नमूद केले.