एम एस १० हजार एक ही उसाची जास्त साखर उतारा देणारी व लवकर पक्व होणारी जात फलटण तालुक्यातील पारगाव येथील मध्यवर्ती ऊस केंद्रात विकसित करण्यात आली असून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. या जातीच्या उसाचे जास्त उत्पादन घेतल्यास ते शेतकरी व साखर कारखानदारांच्या फायद्याचे ठरणार आहे. सन २०१० मध्ये प्रथम ही जात तयार करण्यात आली व ती फुले-२६५ आणि एम एस ६०२ यांच्या संकरातून तयार करण्यात आल्याने त्याला एम एस १० हजार एक असे नाव देण्यात आले आहे.
एम एस १० हजार एक या जातीचे वैशिष्टय़ म्हणजे दहा ते बारा महिन्यांत उसाला पक्वता येते. साखरेचा उतारा, उसाचे उत्पादन इतर लवकर पक्व होणाऱ्या जातींपेक्षा जास्त आहे. क्षारपड जमिनीत चांगले तग धरून राहते. चांगले उत्पादन येते. तसेच ही जात कानी, लालकुद व इतर रोगांना प्रतिकारक आहे. कमी पाण्यात इतर जातींपेक्षा चांगली वाढते. ही जात तयार करण्यात संशोधन केंद्रातील डॉ. रामदास गारकर, दत्तात्रय थोरवे, कृषी सहायक मरतड भुसे, अंकुश भोसले, मृद्शास्त्रज्ञ डॉ. धमेंद्र फाळके, रोगशास्त्रज्ञ सूरज नलावडे, मंगेश बडगुजर यांची मदत झाली असून ऊसतज्ज्ञ डॉ. एस. एम. पवार संशोधन कार्यात प्रमुख होते.
उसाच्या पारंपरिक जाती या मध्यम पक्वता असलेल्या आहेत. या जातीचे उस १४ ते १६ महिन्यात पक्व होतात. मात्र, एम एस १० हजार ही जात १० ते १२ महिन्यात पक्व होते. या जातीचा साखर उतारा चांगला आहे, लवकर पक्व होते. तसेच पूर्वीच्या जातीपेक्षा अर्धा टक्का साखर जास्त उत्पादन होते. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, ता. फलटण येथे हा प्रयोग केला. तो यशस्वी झाल्याची खात्री झाल्यानंतर गोवा येथील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची (डीएसटीए) जी साखर परिषद झाली, त्या वेळी याबाबतचा संशोधन प्रबंध सादर करण्यात आला होता. त्याबाबत डीएसटीएच्या यंदाच्या वर्षी झालेल्या साखर परिषदेत डॉ. पवार यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
गेल्या वर्षी ज्या कारखाने व शेतकऱ्ऱ्यांना एम एस १० हजार एकची बियाणे देण्यात आले होते. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर यंदा हे बियाणे प्रसारीत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
प्रसारण म्हणजे चारही कृषी विद्यापीठाची बैठक होते. त्यानंतर सरकारकडे त्यात पिकाचे उत्पादन करण्याची शिफारस केली जाते. सरकारकडून अधिकृत शिक्का मिळाल्यानंतर ते उत्पादन प्रसारित करता येते. एम एस १० हजारचे प्रसारण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी पाडगावला एम एस १० हजार एकची बियाणे तयार करून साखर कारखान्यांना, शेतकऱ्यांना पुरविली जातात. जेणेकरून जास्तीत जास्त क्षेत्रात त्याचा प्रसार व्हावा. या उसाच्या जातीचा प्रसार झाला तर शेतकरी व साखर कारखानदार या दोघांनाही त्याचा फायदा होईल.
-डॉ. एस. एम. पवार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New sugar cane being developed
First published on: 24-08-2016 at 03:17 IST