पुणे : यंदाच्या एप्रिलमध्ये तापमानाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. शिवाजीनगर येथे १३ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिल्याची नोंद झाली असून, गेल्या दहा वर्षांत २०१६मध्ये ११, २०१९मध्ये १२ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक होते. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत यंदाच्या एप्रिलमधील सर्वाधिक दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिल्याचे दिसून येत आहे.

तापमानाचा पारा यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच वाढू लागला. कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसभर उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. तसेच, शहरात तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. कोरडे हवामान, उत्तरेकडून येणारे उष्ण वारे अशा कारणांमुळे तापमानात वाढ होत राहिली आहे.

हवामान विभागाच्या गेल्या दहा वर्षांतील एप्रिलमधील तापमानाचा आढावा घेतला असता, शिवाजीनगर येथे २०१६मध्ये ११ दिवस, २०१९मध्ये १२ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिले होते. तर यंदा नवा विक्रम नोंदवला जाऊन गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक १३ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिले आहे. २०१५मध्ये एक, २०१६मध्ये ११, २०१७मध्ये सहा, २०१८मध्ये दोन, २०१९मध्ये १२, २०२०मध्ये एक, २०२२मध्ये सात, २०२३मध्ये एक, २०२४मध्ये सात दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक नोंदवले गेले होते. तर २०२१मध्ये एकदाही तापमानाने चाळीशी गाठली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, यंदा एप्रिलमध्ये १३ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहण्यामागे ठोस असणे कारण नाही. तापमानात चढ-उतार होत राहतात.

तापमानात ४ मे नंतर घट

पुढील तीन ते चार दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४ मेच्या सुमारास तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकेल. हवेतील आर्द्रता वाढण्याची, तसेच हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचे सानप यांनी सांगितले.