पोषक स्थिती निर्माण झाल्याने सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावतो आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने राज्यात बहुतांश ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकणसह मुंबई, ठाण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधारांचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये धुवाधार कोसळलेल्या पावसाने राज्यात बहुतांश ठिकाणी पूरस्थिती निर्माण केली होती. त्यानंतर दीर्घकाळ दडी मारलेला पाऊस पोषक स्थितीमुळे पुन्हा सक्रिय झाला आहे. दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या मराठवाडय़ातही पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भातही पावसाची हजेरी आहे. गेले तीन महिने मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला असला, तरी सोलापूर जिल्हा कोरडा राहिला होता. मात्र, तेथेही आता पावसाची हजेरी आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सोमवारी (२ सप्टेंबर) महाबळेश्वर, कोल्हापूर, सोलापूर येथे पावसाची नोंद झाली. कोकण विभागात रत्नागिरी, सांताक्रुझ येथे मराठवाडय़ातील उस्मानाबाद आणि विदर्भातील ब्रह्मपुरी, नागपूर येथे संध्याकाळी साडेपाचपर्यंत पावसाची नोंद झाली.
बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पुढील २४ तासांमध्ये ते तीव्र होत जाण्याचे संकेत आहेत. त्याचप्रमाणे अरबी समुद्रात समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
मध्य प्रदेश ते मध्य महाराष्ट्रादरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पोषक स्थितीमुळे मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विशेषत: घाटक्षेत्रात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
पावसाची स्थिती कशी राहणार?
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारांचा अंदाज आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे या भागात पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. पालघर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यंमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यतील घाटक्षेत्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची चिन्हे आहेत. साताऱ्यातही चार दिवस जोरदार पाऊस होणार असून, जालना, परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यतही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.