मराठी रंगभूमीच्या विकासासाठी धोरणात्मक बदल करून धाडसी निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करीत आगामी नाटय़संमेलन सीमावर्ती भागामध्ये बेळगावला घ्यावे, अशी सूचना भाषा विकास विभागाचे राज्यमंत्री उदय सामंत यांनी रविवारी नाटय़ परिषदेला केली. सीमा भागातील भाषासंवर्धनासाठी असलेला निधी या संमेलनाला देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
९४व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात सामंत बोलत होते. जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री दिलीप सोपल, संमेलनाध्यक्ष अरुण काकडे, आमदार गणपतराव देशमुख, लक्ष्मण ढोबळे, दीपक साळुंखे, स्वागताध्यक्ष भारत भेलके, नाटय़परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, कोषाध्यक्ष लता नार्वेकर, नगराध्यक्षा उज्ज्वला भालेराव, पंढरपूर शाखेचे अध्यक्ष दिलीप कोरके, विनोद महाडिक, सागर यादव या प्रसंगी उपस्थित होते.
सीमा भागातील मराठी भाषकांना नाटय़ परिषद त्यांच्या पाठीशी नव्हेतर त्यांच्याबरोबर असल्याचा दिलासा देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आगामी संमेलन बेळगावला घेतले जावे, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. अर्थात, राज्य सरकारचा मंत्री किंवा नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाचा सदस्य म्हणून नव्हेतर वैयक्तिक स्वरूपाचे हे मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सामंत यांची ही सूचना सुनील तटकरे, दिलीप सोपल आणि लक्ष्मण ढोबळे या आजी- माजी मंत्र्यांनी उचलून धरली.
मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सवाचे आयोजन करण्याची ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे (एनएसडी) अध्यक्ष वामन केंद्रे यांची सूचना स्वागतार्ह असल्याचे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले. ‘देशोदेशीच्या रंगभूमीवरील नाटके पाहण्याचा योग जुळवून आणण्याच्या या प्रस्तावाला सर्वच मान्यवरांनी पाठिंबा दर्शविला. मुंबईमध्ये मराठी भाषा भवनाच्या उभारणीबरोबरच मराठी भाषेला अभिजात दर्जा संपादनासाठी सर्व खासदारांना आवाहन करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
संगीत नाटकांनी मराठी रसिकांचा कान तयार केला. ऐतिहासिक नाटकांनी गारुड निर्माण केले. आता नव्या पिढीच्या प्रेक्षकांसाठी नवीन नाटकांच्या निर्मितीचे आव्हान नाटय़ परिषदेने आपल्या खांद्यावर पेलावे, अशी अपेक्षा सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. नाटय़संमेलनाला अधिकाधिक रंगकर्मी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
या संमेलनात नाटकांच्या सर्व प्रवाहांची सखोल चर्चा झाली असून, पंढरपूरच्या रसिकांशी संवाद साधता आला याचा आनंद अरुण काकडे यांनी व्यक्त केला. पंढरपूर येथील प्रस्तावित नाटय़गृहाच्या उभारणीसाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उदय सामंत यांनी केली. रंगभूमीच्या कोणत्याही प्रवाहाविषयी आपपरभाव ठेवू नये ही शिकवण वारकऱ्यांच्या भूमीने दिली असल्याची भावना दीपक करंजीकर यांनी व्यक्त केली.
नाटय़ कला अकादमीसाठी भूखंड द्यावा
नाटय़ परिषदेची राज्य सरकारकडे मागणी
विद्याधर कुलकर्णी/ शं. ना. नवरे नाटय़नगरी
पंढरपूर राज्य सरकारने मंजूर केलेल्या निधीतील साडेतीन कोटी रुपयांचे अनुदान मिळाल्यानंतर प्रस्तावित नाटय़ कला अकादमीसाठी पाच एकरचा भूखंड देण्याची मागणी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने ठरावाद्वारे केली. मराठी रंगभूमी संक्रमणावस्थेत जात असल्याने राज्य सरकारने मराठी नाटकांच्या बसला महामार्गावरील टोल माफ करावेत. यासह विविध मागण्यांचे साकडे घालत ९४व्या नाटय़संमेलनाचे सूप वाजले.
नाटय़संमेलनाध्यक्ष अरुण काकडे, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, कोषाध्यक्ष लता नार्वेकर, उपाध्यक्ष प्रमोद भुसारी आणि सहकार्यवाह भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत झालेल्या खुल्या अधिवेशनात विविध ठराव मांडून संमत करण्यात आले.
कलावंताच्या घरासाठी भूखंड देण्याची घोषणा कार्यवाहीमध्ये आणावी, बालरंगभूमीच्या संवर्धनासाठी व्यावसायिक नाटकांच्या धर्तीवर बालनाटय़ांनाही राज्य सरकारने अनुदान द्यावे. राज्य सरकारने तयार केलेले सांस्कृतिक धोरण लवकरात लवकर मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रयोग परवाना प्रमाणपत्रांबरोबर एक वर्षांची पोलीस परवानगी आणि अन्य सर्व परवान्यांसाठी सरकारने ‘एक खिडकी योजना’ राबवावी अशा मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले.