आगामी नाटय़संमेलनासाठी तीन ठिकाणांहून निमंत्रणे आली असली, तरी त्यामध्ये नागपूरचे पारडे जड असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच नाटय़कर्मीचा दरबार देखील उपराजधानीमध्ये भरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी होत असलेल्या या संमेलनाच्या आयोजकांमधून राजकारण्यांना वगळावे अशीही एक भू्मिका पुढे येत असल्याने अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये नागपूर या स्थळावरच शिक्कामोर्तब होईल.
बारामती येथील नाटय़संमेलनानंतर आगामी नाटय़संमेलनासाठी सातारा, पंढरपूर आणि नागपूर अशा तीन ठिकाणची निमंत्रणे आली आहेत. खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यासाठी, आमदार भारत भेलके हे पंढरपूरसाठी तर, सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी हे नागपूरसाठी उत्सुक आहेत. तीन ते पाच जानेवारी या कालावधीमध्ये सासवड येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे २६ जानेवारीनंतरच्या शनिवार आणि रविवारी नाटय़संमेलन होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या कालावधीमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संमेलनाच्या आयोजकांमध्ये राजकीय व्यक्ती असू नयेत, याचीही दक्षता स्थळ निवडीमध्ये घेतली जाण्याची शक्यता आहे.
नाटय़ परिषदेने प्रत्येक ठिकाणी भेट देण्यासाठी नियामक मंडळातील दोनजणांची समिती स्थापन केली आहे. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या समितीने नागपूर येथे भेट दिली आहे. प्रफुल्ल महाजन आणि सुधीर वनजू यांच्या समितीने पंढरपूर या स्थळाला भेट दिली आहे. तर, सुनील महाजन आणि भाऊसाहेब भोईर यांचा समावेश असलेली समिती सातारा या ठिकाणी भेट देणार आहे. या सर्व समित्यांचे अहवाल नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळ बैठकीत सादर होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
नागपूरलाच प्राधान्य का?
– यापूर्वीची दोन नाटय़संमेलने सांगली आणि बारामती येथे झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पंढरपूर यापैकी एका ठिकाणी संमेलन घ्यावे का?
– नागपूर येथील संयोजक गिरीश गांधी हे राजकीय व्यक्तिमत्त्व नसल्याने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर नसेल.
– नाटय़ परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये केलेल्या उपकाराची परतफेड म्हणूनही नागपूरचा विचार होण्याची सर्वाधिक शक्यता.