पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) दरवर्षी १ एप्रिलला पथकरात (टोल) वाढ केली जाते. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे पथकर दरात वाढ करण्याचा निर्णय प्राधिकरणाने पुढे ढकलला आहे. आचार संहितेमुळे पथकर दरात वाढ करता येत नसल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. निवडणूक झाल्यानंतर वाढीव पथकर दर लागू होणार आहेत.

हेही वाचा >>> ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण

महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागांतर्गत सहा पथकर नाके आहेत. त्यात पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर, आनेवाडी, पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस, सरडेवाडी आणि खेड-सिन्नर महामार्गावरील हिवरगाव पावसा, चाळकवाडी या पथकर नाक्यांचा समावेश आहे. प्राधिकरणाकडून घाऊक महागाई निर्देशांकासह इतर निकषांच्या आधारे दरवर्षी १ एप्रिलला पथकर दरात वाढ केली जाते. ही वाढ सुमारे ५ टक्के असते. यंदा तेवढीच वाढ अपेक्षित होती. मात्र, महामार्ग प्राधिकरणाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पथकर वाढीचा निर्णय लांबणीवर टाकला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे पथकर दरातील वार्षिक वाढीबाबत निवडणूक आयोगाकडे महामार्ग प्राधिकरणाने विचारणा केली होती. त्यावर आचार संहितेच्या काळात अशी वाढ करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा दिला. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या आदेशामध्येही पथकर दरात वाढ करावी की नाही याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने पथकर दरातील वाढ लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.