Nigdi Chakan Metro line Update: पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व चाकण औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या प्रस्तावित भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो मार्गाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याचे (डीपीआर) महामेट्रोकडून सादरीकरण करण्यात आले.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी ही माहिती दिली. फुगेवाडीतील मेट्राेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचआय) प्रकल्प संचालक संजय कदम, महा मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बापू गायकवाड, माजी नगरसेवक या वेळी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरात सद्य:स्थितीत दापोडी ते पिंपरी अशी मेट्रो धावत आहे. या मार्गाचे पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. आता भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चाकण असा दुसऱ्या मार्गाचा आराखडा तयार झाला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (महामेट्रो) हा आराखडा महापालिकेकडे सादर केला आहे. या आराखड्याचे लाेकप्रतिनिधींसमोर सादरीकरण करण्यात आले.
‘मेट्रो तीनऐवजी सहा डब्यांची करा‘
शहराची लाेकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातील वाढती लाेकसंख्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन सविस्तर प्रकल्प आराखड्यात सुधारणा करून तीनऐवजी सहा डब्यांच्या मेट्रो गाड्या ठेवाव्यात. हा प्रकल्प वेगाने हाती घ्यावा, अशी सूचना लाेकप्रतिनिधींनी केली.
प्रस्तावित मार्ग
निगडीतील भक्ती शक्ती चौक – मुकाई चौक, किवळे-भुजबळ चौक, वाकड साई चौक, पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी-कोकणे चौक, नाशिक फाटा – संत तुकारामनगर चौक, गवळी माथा चौक, भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर, गोडाऊन चौक ते चाकण असा प्रस्तावित मार्ग असणार आहे.
शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी मेट्रो विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. या मेट्रो विस्तारीकरणाबाबत लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करून पुढील कार्यवाहीसाठी हा प्रकल्प अहवाल शासनास पाठविण्यात येणार आहे. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येणार आहे.– शेखर सिंह,आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
मेट्रो मार्ग ज्या रस्त्यावरून जाणार आहे, तिथे भविष्यात वाहतूककोंडी होऊ नये यासाठी आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारता येईल का, याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि मेट्रो प्रशासनाने अभ्यास करावा. त्यानुसार नियोजन करावे.-श्रीरंग बारणे, खासदार
भक्ती-शक्ती, निगडी- कॅनबे चौक (तळवडे) ते चाकण एमआयडीसी टप्पा पाच अशी नवीन मार्गिका प्रस्तावित करावी. त्यासाठी सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा.- महेश लांडगे, आमदार