पुणे : पुण्यात आज निर्भय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे प्रमुख भाषण आहे. मात्र, ही सभा होऊ देणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निखिल वागळे यांच्याविरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे पत्रकार निखिल वागळे यांचे पुण्यात भाषण होऊ देणार नाही कायदा आणि सुव्यवस्था रखाण्यासाठी पोलिसांनी सदर भाषणाला परवानगी नाकारावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे पोलिसांकडे केली.
ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वागळे यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर भाजपचे नेते सुनील देवधर यांनी वागळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे केली होती. वागळे यांच्या आज पुण्यात होणाऱ्या सभेस परवानगी देऊ नये, अशीही मागणी देवधर यांनी केली आहे.
हेही वाचा…सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अमृतमहोत्सवी वर्ष संपले; नियोजन केवळ कागदावरच
वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी अवमानकारक विधान केले होते. केवळ प्रसिद्धीसाठी वागळे वादग्रस्त वक्तव्य करून लोकप्रियता मिळवत आहेत .त्यांच्या भाषणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वागळे यांच्या भाषणास परवानगी नाकारण्यात यावी. पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही त्यांचे भाषण उधळून लावू, असा इशारा घाटे यांनी दिला.
यासंदर्भात पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी घाटे यांच्यासह सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, राहुल भंडारे , राघवेंद्र मानकर माजी नगरसेवक महेश वाबळे, स्मिता वस्ते, प्रशांत हरसूले ,पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.