महानगर पालिका निवडणुकीच्या वेळी भाजपने गुंडांना प्रवेश दिला अशी टीका भाजपवर होत होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यावरही विरोधकांनी ही टीका सुरुच ठेवली. त्या टीकेला उत्तर देताना भाजपमध्ये आल्यावर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो असे भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर भाजपने आयात उमेदवारांना तिकीटे देऊन सत्ता आणली अशी ओरड होऊ लागली होती. विरोधकांना पक्षात घेतल्या शिवाय पक्षच वाढणार नाही असे मत गडकरी यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मांडले. मतदात्यांची संख्या तर स्थिर आहे. त्यामुळे भाजपला जी मते पडणार आहेत ती विरोधकांचीच असतील. तेव्हा विरोधी पक्षातील उमेदवारास तिकीट दिल्यास कुठे बिघडते असे त्यांनी म्हटले.

विरोधी पक्षातील लोकांना तिकीटे दिल्यामुळे भाजपमधील कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांची देखील मनधरणी करण्याचा प्रयत्न गडकरी यांनी केला. एखाद्या नव्या सुनेचे आपण घरात स्वागत करतो त्या प्रमाणे बाहेरील उमेदवाराचे स्वागत करा असे त्यांनी म्हटले. जर पक्ष वाढला तरच तुम्हाला मान मिळेल पक्ष जर वाढला नाही तर तुम्हाला मान मिळणार नाही तेव्हा नव्या उमेदवारांचे स्वागत करा. तुम्हालाही एक दिवस संधी दिली जाईल असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशामुळे हुरळून जाऊ नका असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. यशामुळे जबाबदारी वाढते याची जाणीव ठेवा असे गडकरी यांनी म्हटले. कुणाची पार्श्वभूमीवर काय आहे यावर सर्वकाही अवलंबून नाही तर आमच्यासोबत आल्यानंतर तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचे आहे. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हे लक्षात ठेवा असे गडकरी यांनी म्हटले. दिल्लीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबदद्ल त्यांनी आनंद व्यक्त केला. पिंपरी चिंचवड येथे दोन दिवस राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे.