भारतीय जनता पक्षाचे नेते आणि नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी रविवारी (२ मार्च) पुण्यात येत असून गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांची प्रमुख उपस्थिती असेल.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यात गडकरी यांची उमेदवारी जाहीर झाली असून ते प्रथमच लोकसभेसाठी लढत आहेत. निवडणुकीसाठी सुरू झालेल्या धामधुमीतच ते रविवारी पुण्यात येत असून साने गुरुजी तरुण मंडळातर्फे आयोजित कौटुंबिक स्नेहमेळाव्यात त्यांचे भाषण होईल. गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी सहा वाजता हा मेळावा होणार आहे.
मंडळाच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा मेळावा होत असून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचीही या वेळी प्रमुख उपस्थिती असेल. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कारही या कार्यक्रमात केला जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.