पिंपरी- चिंचवड: नितीन गिलबिले हत्या प्रकरणाचं खर कारण समोर आलं आहे. आत्तापर्यंत या हत्येप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. नितीनची हत्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी दिली आहे. गेल्या दीड महिन्यापासून नितीन गिलबिलेच्या हत्येचा कट शिजत होता. मैत्रीतला दुरावा कमी करण्याच्या बहाण्याने पुन्हा नीतीनशी अमित पठारे जवळीक साधत होता. त्यांच्यात भेट व्हायला लागली. परंतु, कुठेतरी आधीची मैत्री दोघांमध्ये राहिली नव्हती.

असा रंगला ‘त्या’ दिवशी हत्येचा थरार…

१२ नोव्हेंबर रोजी तयारी करून अमित पठारे, विक्रांत ठाकूर आणि इतर दोघांना घेऊन नीतीनच्या ऑफिसवर गेला. दोघांना आधीच रस्त्याच्या कडेला उतरवले. अमित सोबत विक्रांत होता. वडमुखवाडी – अलंकापुरम रस्त्यावर नीतीनचे काही पत्र्याचे शेड भाड्याने होते. तिथंच जवळ ऑफिसही होतं. अमित पठारे फॉर्च्युनर गाडीत बसलेला होता. त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता. विक्रांत नितीनकडे गेला आणि अमितचा वाढदिवस आहे. त्याला शुभेच्छा दे, तो बाहेर गाडीत आहे, असं सांगितलं.

नितीन गाडीच्या ड्रायव्हर सीटवर बसलेल्या अमितकडे गेला. अमितने नितीनला गाडीत बसण्याचा आग्रह केला. तो दुसऱ्या बाजूने येऊन समोर बसला. मात्र, आपला मित्र आपला जीव घेईल असं त्याला क्वचितही वाटलं नसेल. नितीन बेसावध, मनमोकळेपणाने बसला. काही क्षणातच अमितने पिस्तुल लोड करून एक गोळी थेट त्याच्या डोक्याच्या दिशेने झाडली. क्षणात नितीन आहे, तसाच निपचित गाडीत पडला. गाडीच्या बाहेर असलेल्या विक्रांत ठाकूरने त्याला जखमी अवस्थेत फॉर्च्युनरच्या खाली फेकून दिले. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या आकाश पठारे आणि सुमित पटेलला गाडीत घेतलं आणि चौघे पसार झाले. ही सर्व घटना १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. ही सर्व माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

पोलिसांनी आरोपींचा शोध कसा घेतला?

प्रकरण गंभीर असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. फिरेन्सिक तज्ञ, पोलिस उपायुक्त शिवाजी पवार, मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्ष प्रमोद वाघ यांसह गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत आरोपींच्या गाडीच्या दिशेने पोलिसांची पथक रवाना झाली. गुन्हे शाखेचे तपास पथक, दिघी पोलीस आरोपींचा शोध घेत होते. काही तासांनी खंडणी विरोधी पथकाने ताम्हणी घाटातून विक्रांत ठाकूर आणि सुमित पटेल ला अटक केली. त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. अमित पठारे ला देखील दिघी पोलिसांनी वाघोली परिसरातून अटक केली. गुन्ह्यात मदत केलेली आकाश पठारे ला गुन्हे शाखा युनिट तीन ने अटक केली.

अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर सराईत गुन्हेगार?

विक्रांत ठाकूर यांच्यावर मारामारीचे तीन गुन्हे दाखल आहेत. अमित पठारे याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. अमित पठारे आणि नितीनचा प्लॉटींगची जमिन विक्री- खरेदीचा व्यवसाय होता.

अमित पठारेने पिस्तुल कुठून आणले?

हत्येचा कट एक ते दीड महिन्यांपूर्वी रचण्यात आला होता. अमित पठारे पिस्तुल बाळगून होता. मद्यपान केल्यानंतर नितीन गिलबिलेच्या नावाने अमित सतत शिव्या द्यायचा. नितीन चा त्याला अत्यंत राग होता. अद्याप अमितने पिस्तुल कुठून आणले हे तपासात पुढे आले नाही. पिस्तूलाचा शोध पोलीस घेत आहेत.