पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरपदी पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विराजमान झाले आहेत. बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर पिंपरी चिंचवडचे महापौरपद आणि उपमहापौरपद भाजपच्या पदरात पडले आहे. महापौरपदी भोसरीचे नितीन काळजे आणि उपमहापौरपदी पिंपरीच्या शैलजा मोरे यांची बिनविरोध निवड झाली.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे भाजपचा विजय सोपा झाला होता. मात्र अचानकपणे राष्ट्रवादीने महापौरपदासाठी श्याम लांडे यांना अर्ज भरायला लावला तर उपमहापौर पदासाठी निकीता कदम यांनी अर्ज भरला. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार, अशी चिन्हे होती. परंतु आज पिठासीन अधिकाऱ्यांनी दिलेल्या पंधरा मिनिटाच्या मुदतीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे नितीन काळजे महापौर म्हणून तर शैलजा मोरे उपमहापौर म्हणून बिनविरोध निवडून आले.
तत्पूर्वी सकाळी महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे आणि सभागृह नेते एकनाथ पवार यांनी बैलगाडीतून महानगरपालिकेत प्रवेश केला. सकाळी क्रांतीवीर चाफेकर वाड्याला भेट दिली. यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी मोरया गोसावी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये एकच जल्लोष झाला. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. मोदींचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी प्रवेशद्वाराजवळ सनई चौघडे वाजत होते. यासोबतच ढोल ताशांचा गजर करत फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.