महापालिका शिक्षण मंडळाचा कारभार गेले अनेक महिने कागदोपत्री सुरू असल्यामुळे मंडळातील हजारो विद्यार्थ्यांंना त्याचा फटका बसत आहे. माध्यमिक आणि पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अवघ्या दोन महिन्यांवर येऊनही या परीक्षेच्या तयारीसाठीची पुस्तके विद्यार्थ्यांना अद्याप देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे महापालिका शाळांमधील गुणी विद्यार्थी शिष्यवृत्तीचा अभ्यास पुस्तकांशिवाय करत आहेत.
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शिक्षण मंडळाचे सदस्य मंडळाचा कारभार पाहू शकत नाहीत असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मंडळ सदस्यांकडून हा कारभार काढून घेण्यात आला असला, तरी मंडळाचा कारभार नक्की कोणी पहायचा याचाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक आदी सर्वाशी संबंधित निर्णय गेले काही महिने रखडले आहेत. त्याचा फटका गुणी विद्यार्थ्यांना बसत असून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी विद्यार्थी पुस्तकांशिवाय करत आहेत. मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले यश संपादन करतात. गुणवत्ता यादीतही हे विद्यार्थी चमकतात. यंदा मात्र परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना पुस्तकेच देण्यात आलेली नाहीत.
गेल्यावर्षी बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांचा तुलनात्मक अभ्यास करून आम्ही त्यातील उत्तम पुस्तके विद्यार्थ्यांना दिली होती. ती खरेदी प्रक्रिया सप्टेंबर महिन्यातच पूर्ण झाली होती आणि विद्यार्थ्यांना लगेच शिष्यवृत्तीच्या पुस्तकांचे वाटप केले होते. यंदा मात्र ही पुस्तके खरेदी करण्यासाठीच्या निविदांवर अद्यापही शिक्षण प्रमुखांची स्वाक्षरीच झालेली नाही. परीक्षा दोन महिन्यांवर आली असून यापुढे खरेदीची प्रक्रिया होणार आणि विद्यार्थ्यांना पुस्तके केव्हा मिळणार याबाबत अनिश्चितता आहे, अशी माहिती मंडळाचे सदस्य शिरीष फडतरे यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. स्वेटर खरेदीची निविदा प्रक्रिया देखील मे महिन्यात सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्याप खरेदीचा आदेश संबंधितांना देण्यात आलेला नाही.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारणेसाठी मंडळाने अंदाजपत्रकात मोठय़ा तरतुदी केल्या असून त्यातील एकाही गोष्टीची पूर्तता यंदा झालेली नाही. अनेक शाळांमध्ये संगणक कक्ष सुरू करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मात्र, यंदा संगणक खरेदी करण्यात आले नाहीत. त्याबरोबरच ज्या शाळांना संगणक देण्यात आले आहेत त्यासाठीची आवश्यक टेबल खरेदी न केल्यामुळे त्या संगणकांचाही वापर होत नाही, अशी परिस्थिती आहे. मंडळाच्या सदस्यांची सर्वसाधारण सभाही अनेक महिन्यात झालेली नाही.

महापालिका शिक्षण मंडळाचा कारभार नेमका कोणी पाहायचा, महापालिकेने का शिक्षण मंडळाने, याबाबत स्पष्टता झालेली नसल्यामुळे राज्याच्या शिक्षण सचिवांकडून त्याबाबत मत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांच्याशी पत्रव्यवहार करून मार्गदर्शन घेतले जाणार आहे.
महापौर दत्तात्रय धनकवडे