महापालिकेतर्फे आयोजित केले जाणार असलेले विविध महोत्सव हे करमणुकीचे वा मनोरंजनाचे नसून त्यातून महिला व युवकांसाठी अनेक चांगले उपक्रम केले जाणार आहेत. त्यामुळे हे महोत्सव ठरल्याप्रमाणेच होतील, असे बुधवारी जाहीर करण्यात आले. या महोत्सवांसाठी पन्नास लाख रुपये खर्च केले जाणार असून या खर्चावर टीका होत आहे.
महापालिका अंदाजपत्रकात जेवढे उत्पन्न यंदा अंदाजित करण्यात आले आहे त्यात घट येत असल्यामुळे अनेक विकासकामे सुरू करणे अद्याप शक्य झालेले नाही. मात्र अशा परिस्थितीत आणखी काही महोत्सवांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे व त्या खर्चाला स्थायी समितीने एकमताने मान्यता दिल्यामुळे हे महोत्सव वागग्रस्त ठरले आहेत.
 सावित्रीबाई फुले जयंती (३ जानेवारी) ते जागतिक महिला दिन (८ मार्च) या कालावधीत महापालिकेच्या वतीने युथ फेस्टिव्हल आणि महिला महोत्सवाचे आयोजन होणार आहे. तसेच युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुरुषोत्तम करंडकच्या धर्तीवर महापौर करंडक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवांवर पन्नास लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या महोत्सवांबाबत बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना महापौर दत्तात्रय धनकवडे म्हणाले की, या महोत्सवात कोणत्याही प्रकारचे मनोरंजनाचे वा करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. दोन्ही महोत्सवांमध्ये महिला तसेच युवती व युवकांसाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.