पुणे : सर्व दूध संघांनी दूध विक्रीच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली असली, तरी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज) ग्राहकांचा विचार करून गायीच्या दूध विक्री दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कात्रजच्या दूध ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
सध्या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून जीरा ताक, लस्सी आणि दह्याची माफक दरामध्ये विक्री केली जात आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळा हंगामात ताकाची दैनंदिन ४५ हजार लिटर एवढी उच्चांकी विक्री झाली. तसेच, कात्रज दूध संघ पुणे जिल्ह्यातील गावांमधून दूध संकलन करत असून, अगदी कमी वेळात अतिशय उकृष्ट दर्जाचे गायीचे दूध ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. तरी सध्या गायीच्या दूध विक्री दरामध्ये वाढ करण्यात येणार नाही, असे संघाचे चेअरमन स्वप्नील ढमढेरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
कात्रज डेअरीच्या दुधाच्या दरात कोणी वितरकांनी अतिरिक्त पैशांची मागणी केल्यास त्याबाबत संघाच्या ग्राहक तक्रार निवारण क्रमांकाशी संपर्क साधावा, तसेच दूध दरवाढीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही ढमढेरे यांनी केले आहे.