१५ वर्षांत विकल्या किंवा चालवायला दिलेल्या कारखान्यांची यादी अजित पवारांकडून  जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकांसह इतर बँकांनी, शासन मान्यतेने आणि कारखान्यांनी त्यांच्या स्तरावर गेल्या १५ वर्षांत ६५ साखर कारखाने विकले किंवा चालवायला दिले. त्यामध्ये अनेक कारखाने तीन-चार कोटी रुपयांना विकले गेले आहेत. मात्र, त्याबद्दल कुणीच बोलत नाहीत, आरोप करत नाहीत. केंद्रीय यंत्रणेने काम करताना सर्वाना समान न्याय लावावा, अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. तसेच या ६५ कारखान्यांपैकी ठरावीकच कारखाने डोळय़ासमोर ठेवून आरोप करत बदनामी केली जात आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची विक्री पूर्णपणे कायदेशीर आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुणे दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकार परिषदेत ६५ कारखान्यांची यादी वाचून दाखवत कोणता कारखाना किती किमतीला विकला गेला याची आकडेवारी सांगितली. कारखाने कुणी घेतले, याबाबत कोणत्याही राजकीय नेत्यांची नावे न घेता त्यांनी कंपन्यांची नावे वाचून दाखवली.

पवार म्हणाले, मागच्या सरकारच्या काळात गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), आर्थिक गुन्हे विभाग (ईओडब्ल्यू) आणि सहकार विभाग, न्यायाधीश या सर्वाच्या चौकशीतून काहीही निष्पन्न झालेले नाही.

आता केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या चौकशीतूनही वस्तुस्थिती समोर येईल. ज्यांना कारखाने नाममात्र दराने विकले जातात, असे वाटते त्यांनी कारखाने विकायला किंवा चालवायला देण्यासाठी काढल्यानंतर निविदा भराव्यात. साखर कारखाना चालवणे येरा गबाळय़ाचे काम नाही.

दरम्यान, १५ वर्षांत राज्यात ६५ कारखान्यांची विक्री झाली किंवा ते चालवायला देण्यात आले. मात्र, काही जण ठरावीक कारखान्यांच्या विक्रीबाबत आरोप करत आहेत. कोणाची तरी बदनामी करण्यासाठीच आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांचे नाव न घेता पवार यांनी केली.

..म्हणून जरंडेश्वरला ७०० कोटींचे कर्ज

या कारखान्याची क्षमता १५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याची आहे. साखरेचे एक पोते तयार झाल्यानंतर त्या पोत्यावर ८५ ते ९० टक्के कर्ज मिळते.  कर्जाची परतफेड नियमित केली जात आहे. शेतकऱ्यांना उसाचे, तसेच साखर आणि इथेनॉल विक्री असे सर्व प्रकारचे या कारखान्याचे सर्व व्यवहार धनादेशाद्वारे केले जातात, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.