‘‘आमचा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध कधीच नव्हता. त्यातील काही कलमांबाबत आमचा आक्षेप होता. अंधश्रद्धेला आमचा विरोधच आहे पण त्याचवेळी लोकांच्या श्रद्धेला धक्का लागू नये अशी आमची भूमिका होती, ’ असे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी गुरूवारी सांगितले.
पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला आले असता मुंडे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी धार्मिक संघटनांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाने फेटाळल्याच्या निर्णयाबाबत विचारले असता मुंडे म्हणाले, ‘संघटनांवर बंदी घालून त्यामागची प्रवृत्ती बदलणार नाही. मात्र, डॉ. दाभोलकराच्या हत्येमागे जे कोणी असेल, त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. प्रामाणिकपणे ध्येयासाठी काम करणाऱ्या डॉ. दाभोलकरांसारख्या नेत्याची हत्या होते हे कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसल्याचे लक्षण आहे. यापूर्वी पुण्यामध्ये सतीश शेट्टींचा खून झाला, अलुरकर, दर्शना डोंगरे. यांच्या खुनाचा तपास अजूनही लागलेला नाही. डॉ. दाभोलकरांच्या खुन्यांचाही अजून तपास लागलेला नाही. या आधी झालेल्या खुनांचा तपास झाला असता, दोषींना शिक्षा झाली असती, तर हा खून करण्यासाठी मारेक ऱ्यांचे धाडसच झाले नसते. डॉ. दाभोलकरांसारख्या कार्यकर्त्यांला हे सरकार वाचवू शकले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तपासाबाबत अजून काही चौकशी केलेली नाही. आतापर्यंतच्या अनुभवावरून हे तरी मारेकरी सापडतील का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.’ डॉ. दाभोलकरांच्या परिवाराची शुक्रवारी भेट घेणार असल्याचेही मुंडे यांनी या वेळी सांगितले.