महापालिकेच्या २० माध्यमिक शाळांमध्ये इंग्रजी, शास्त्र आणि गणित या महत्त्वाच्या विषयांना शिक्षकच नसल्यामुळे आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांचा या महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास सध्या बंद आहे. या ४० शिक्षकांची भरती नेमकी कोणत्या कारणांनी अडली आहे अशी शंका घेतली जात असून शिक्षकांची भरती तातडीने करावी, अशीही मागणी सोमवारी आयुक्तांकडे करण्यात आली.
शहरात महापालिकेच्या २० माध्यमिक शाळा असून त्या सुरू होऊन तीन आठवडे झाले असले, तरीही तेथे अद्याप शिक्षकच नाहीत अशी तक्रार सजग नागरिक मंचने केली आहे. मंचचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी सोमवारी आयुक्तांची भेट घेऊन त्याबाबत निवेदन दिले. या शाळांमधील महत्त्वाच्या विषयांची ४० शिक्षक पदे रिक्त असून ती भरण्यासाठी महापालिकेतर्फे १२ जून रोजी ‘वॉक इन इंटरव्ह्य़ू’ घेण्यात आले. मात्र, त्या मुलाखतींचे निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. या निकालाला एवढा उशीर लागण्याचे कारणच काय, असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
शाळा सुरू होऊन तीन आठवडे उलटूनही महत्त्वाच्या विषयांना शिक्षक मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा या विषयांचा अभ्यासच बंद आहे. विशेषत: दहावीच्या विद्यार्थ्यांचे त्यामुळे नुकसान होत आहे. पालिका शाळांमधील शेकडो विद्यार्थी गुणवंत असून माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल दरवर्षी चांगला लागतो. अशा परिस्थितीत दहावीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी, गणित, शास्त्र या विषयांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक असताना महापालिका अद्यापही मुलाखतींचे निकाल का लावत नाही, अशीही विचारणा सजग नागरिक मंचने केली आहे.