लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदार संघावर दावा केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने मावळ लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. मावळमधून तीनवेळा राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी मागणी शहर पदाधिकाऱ्यांनी प्रदेश नेतृत्वाकडे केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा अवधी असताना महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराचा पराभव होत असून काँग्रेसपेक्षा जास्त ताकद असल्याचा दावा करत राष्ट्रवादीने पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसने मावळात राष्ट्रवादीचा सलग तीनवेळा पराभव झाला असून काँग्रेसची चांगली ताकद आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी केली. काँग्रेसने पिंपरी-चिंचवडचा कायापालट केला आहे. या भागाचे काँग्रेस नेत्यांनी अनेक वर्ष लोकसभा, विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे.

आणखी वाचा-पुणे लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा तयारी? घेतला ‘हा’ निर्णय

मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीने दोनवेळा बाहेरचा उमेदवार दिला. सलग तीनवेळा राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी. शिरुरपेक्षा मावळात काँग्रेसची चांगली ताकद आहे. देहूरोड कटक मंडळ, लोणावळा नगरपरिषदेत काँग्रेसची सत्ता होती. पनवेलला पक्षाचा आमदार होता. रायगडचे नेतृत्व दिवंगत ए.आर. अंतुले यांनी केले आहे. मावळ मतदारसंघात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला घेण्याची आग्रही मागणी पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेस नेत्यांनी केली आहे. त्यामुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे.

…तर दोन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडावेत

मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिला. तर, पिंपरी-चिंचवड शहरातील दोन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडावेत. तीनही ठिकाणी राष्ट्रवादी लढल्यावर शहरात काँग्रेसला उभारी कधी मिळेल. काँग्रेसला १५-१५ वर्षे निवडणूक लढविण्याची संधी दिली नाही. तर, कार्यकर्ते पक्षात कसे राहतील. काँग्रेसच्या ताकतीने राष्ट्रवादी निवडून येत आहे. त्यामुळे दोन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला घेण्याची मागणी स्थानिक पदाधिका-यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मावळमधून सलग तीनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळे मावळची जागा काँग्रेसला घ्यावी अशी मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. मावळात काँग्रेसची चांगली ताकद आहे. ही जागा मिळावी यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आग्रही आहेत. -बाबू नायर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निमंत्रित सदस्य