राज्यातील चित्रकार, मूर्तिकार आणि  शिल्पकारांसह विविध कला क्षेत्रातील कलाकारांच्या चार दशकांच्या संघर्षांची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. केंद्राने महाराष्ट्र राज्यात ललित कला अकादमीचे केंद्र मंजूर केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील १५ एकर जागेवर ललित कला अकादमीच्या केंद्राची स्थापना होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशामध्ये दिल्ली, लखनऊ, कोलकाता, चेन्नई आणि भुवनेश्वर येथे ललित कला अकादमीची केंद्रे आहेत. महाराष्ट्रामध्ये मात्र कलाकारांची उपेक्षा झाली होती. हे केंद्र राज्यामध्येही उभारले जावे, यासाठी राज्यातील कलाकारांनी विविध पद्धतीने ४० वर्षे आंदोलने केली होती. राज्यातील कलाकारांच्या या संघर्षांला यश मिळाले असून, केंद्रीय सांस्कृतिकमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी पिंपरी-चिंचवड परिसरात हे केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली असल्याचे ललित कला अकादमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रकार उत्तम पाचारणे यांनी सांगितले. माझ्या कारकीर्दीमध्ये आगरतळा येथे केंद्र विकसित झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय कला, संस्कृती आणि परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाने ललित कला अकादमी ही स्वायत्त राष्ट्रीय स्तरावरील संस्था १९४५ मध्ये स्थापन केली. पाचारणे म्हणाले, राज्य शासन लवकरच ललित कला अकादमीशी करार करून जागेचे हस्तांतरण करण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील १५ एकर जागेवर सध्या बाल विकास केंद्र कार्यरत असलेल्या ठिकाणी ललित कला अकादमीचे केंद्र उभारले जाण्याची शक्यता आहे. या जागेवर ५० हजार चौरस फुटांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. सध्या या ठिकाणी करोना केंद्र आहे. मात्र, ललित कला अकादमीचे केंद्र झाल्यानंतर पाश्चात्त्य जगतामध्ये विकसित झालेले तंत्रज्ञान भारतामध्ये पुण्यात प्रथम यावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे.

देशाला महान चित्रकार देणारे जे. जे. कला महाविद्यालय असल्याने मुंबईमध्ये ललित कला अकादमीचे केंद्र असावे यासाठी बॉम्बे आर्ट सोसायटीने प्रयत्न केले. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या विविध पदांवर मी २५ वर्षे काम केले होते. यापूर्वी आरे कॉलनीमध्ये दिलेली जागा शासनाने काढून घेतली होती. वेगवेगळ्या कारणांनी हे केंद्र होऊ शकले नव्हते. आता उशिराने हा होईना हे केंद्र मंजूर झाल्याने सर्व कलांचा एकत्रित आनंद घेण्यासाठी हक्काचे स्थान निर्माण होईल, असा विश्वास पाचारणे यांनी व्यक्त केला.

असे असेल केंद्र

* लेझर तंत्रज्ञान आणि ग्लास सिरॅमिक या कलांसाठी स्वतंत्र दालन. कलाकारांसाठी निवास व्यवस्था, संशोधन स्टुडिओ

* संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि कार्यशाळा. ज्येष्ठ कलाकारांच्या कलाकृतींचे संग्रहालय

* पश्चिम महाराष्ट्रातील कलांचा इतिहास दाखविणारे कायमस्वरूपी प्रदर्शन

* केंद्र आणि राज्य शासनाची प्रत्येकी २५ कोटी रुपयांची गुंतवणूक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now lalit kala akademi kendra in maharashtra too abn
First published on: 24-11-2020 at 00:07 IST