पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा गुरुवारी प्रसिद्ध झाल्यामुळे तो पाहण्यासाठी तसेच त्याची प्रत मिळवण्यासाठी महापालिका भवनात दिवसभर मोठी गर्दी झाली होती. आराखडय़ाला हरकती-सूचना देण्याची प्रक्रिया आता सुरू झाली असून त्यासाठी २७ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
शहराचा विकास आराखडा प्रसिद्ध करण्यासाठी महापालिका प्रशासनाला ४ एप्रिलपर्यंतची मुदत होती. या मुदतीत आराखडा प्रसिद्ध होणार हे स्पष्ट होते, मात्र तो केव्हा प्रसिद्ध होणार याबाबत संबंधित अनेक घटकांना मोठी उत्सुकता होती. अखेर हा बहुचर्चित आराखडा गुरुवारी प्रसिद्ध झाला. तसेच त्याचे नकाशेही महापालिका भवनातील नगर अभियंता कार्यालयाबाहेरील सूचना फलकावर पाहण्यासाठी उपलब्ध झाले. महापालिकेच्या संकेतस्थळावरही हा आराखडा पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. संकेतस्थळावर नकाशे, विकास नियंत्रण नियमावली तसेच आरक्षण सूची व अहवाल उपलब्ध आहे.
नागरिकांना या आराखडय़ासंबंधीच्या हरकती-सूचना २७ एप्रिलपर्यंत नोंदवता येतील. त्या लेखी स्वरुपात नोंदवायच्या असून त्या महापालिका मुख्य भवन खोली क्रमांक ११०, पहिला मजला येथे स्वीकारल्या जातील, अशी माहिती नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी गुरुवारी दिली. ते म्हणाले की, या हरकती-सूचनांच्या सुनावणीसाठी स्थायी समितीचे तीन सदस्य आणि राज्य शासनाचे चार तज्ज्ञ अशी सात जणांनी समिती नियुक्त होणार असून नियोजन समिती स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यात नागरिकांना सुनावणी दिली जाईल. त्यानंतर नियोजन समिती या हरकती-सूचनांसंबंधीच्या शिफारशींचा अहवाल मुख्य सभेला सादर करेल. त्यावर मुख्य सभा दोन महिन्यात निर्णय घेईल. मुख्य सभेच्या मंजुरीनंतर आराखडय़ात बदल असतील, तर त्या बदलांसह अथवा बदल नसतील, तर बदलविरहित नकाशा एक महिन्याच्या आत नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर हा आराखडा व नकाशे अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे जाईल. शासनाला अंतिम मंजुरीसाठी सहा महिन्यांची व सहा महिन्यांची वाढीव मुदत आहे.