राज्याच्या ग्रामीण भागासाठी अनेक छोटी-मोठी कामे सेवाभावनेतून सुरू आहेत. अशा चांगल्या कामांना मदत करण्यासाठी पुणेकर सदैव तत्परतेने पुढे येतात याचा उत्साहवर्धक अनुभव ग्रामीण भागात जलसंधारणाचे काम करणाऱ्या विशाल नेरकर यांना आला. नेरकर करत असलेले जलसंधारणाचे काम पाहून पुण्यातील काही ज्येष्ठ मंडळींनी त्यांना मोलाची आर्थिक मदत केली आणि त्या मदतीतून झालेल्या कामामुळे माण तालुक्यातील एका गावात जलसंधारणाचे काम पूर्ण होऊ शकले. ही मदत दिली पुण्यातील ‘ओल्ड यंग मेन्स क्लब’ने.
विशाल नेरकर यांनी स्वखर्चातून मराठवाडय़ातील दोन गावांमध्ये केलेल्या कामाचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. त्यांनी स्थानिक गावकऱ्यांना बरोबर घेऊन गेल्या वर्षी मराठवाडय़ातील जालना जिल्ह्य़ातील अंबड तालुक्यात असलेल्या पारनेर गावात आणि यंदा वैजापूर तालुक्यातील सवंदगाव येथे जलसंधारणाचे काम यशस्वी केले आहे. त्या संबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या कामाचे अनेकांनी कौतुक केले आणि त्यांच्या कामात सहयोग देण्याचीही तयारी दर्शवली. पुण्यातील काही ज्येष्ठ मंडळींनी तीस-बत्तीस वर्षांपूर्वी ‘ओल्ड यंग मेन्स क्लब’ स्थापन केला आहे. दर बुधवारी एका सदस्याच्या घरी सर्व जण सहज गप्पांसाठी जमतात. तसेच दरमहा काही रक्कमही जमा करतात आणि साठलेली रक्कम चांगल्या संस्थांना आणि चांगल्या कामांना देतात. नेरकर यांच्या कामाची माहिती समल्यानंतर क्लबचे सदस्य डॉ. गोवंडे यांनी नेरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या ज्येष्ठ मंडळींनी एका घरगुती कार्यक्रमात नेरकर यांच्याकडे क्लबच्या वतीने पाच हजारांचा आणि डॉ. गोवंडे यांनी वैयक्तिक पाच हजारांचा निधी सपूर्द केला. क्लबचे अन्य सदस्यही या वेळी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्य़ातील माण हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील शिखर शिंगणापूर या गावात पाण्याच्या उपलब्धतेसाठी काही करता येईल का, अशी विचारणा नेरकर यांचे मित्र अमेय पाटील यांनी केली होती. त्यानुसार या दोघांनी गावाला भेट दिली. सरपंच अभय मेनकुदळे यांनी गेल्या वर्षी गावासाठी बंधारे बांधणे, वृक्षारोपण, डीप सीसी आदी कामे मोठय़ा प्रमाणात केली आहेत. त्याच कामाचा भाग म्हणून आणखी काही डोंगरांवर खोल खड्डे घेण्याच्या कामांचे (डीप कंटिन्युअस काउंटर ट्रेन्चिंग- डीपी सीसीटी) नियोजन नेरकर यांनी केले. या कामात त्यांना सामाजिक कार्यकर्ते ओंकार देशपांडे यांचीही मोलाची मदत झाली. या पद्धतीत डोंगर उतारावर तीन फूट रुंद आणि चार फूट खोल या आकाराचे खड्डे खोदले जातात. पावसाळ्यात त्या खड्डय़ांमध्ये पाणी साठते आणि ते वेगाने झिरपते. त्यामुळे ही पद्धत जलसंधारणासाठी उपयुक्त ठरते असा अनुभव आहे.
ज्येष्ठ मंडळींनी दिलेल्या दहा हजार रुपयांमध्ये नेरकर यांनी स्वत:ची साडेचार हजारांची भर घातली आणि गावातील ज्या चार डोंगरांवर डीप सीसीटीचे काम बाकी होते, ते त्यांनी सरपंच मेनकुदळे, देशपांडे यांच्या मदतीने पूर्ण करून घेतले. या कामाचा फायदा गावाला होणार असून गावाच्या तलावात पाणी साठणार आहे.