पुणे : भारत-पाकिस्तान युद्धामध्ये जायबंदी झाल्यानंतर सुरू झाली ती जगण्याची लढाई. पण, अंगी असलेल्या खिलाडूवृत्तीमुळे अपंगांच्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये केवळ सहभागच नाही तर थेट ऑलिम्पिक पदकांच्या विजेतेपदाने ‘जखमा अशा सुगंधी’ जाहल्या याची प्रचिती शनिवारी पुणेकरांना आली. मुरलीकांत पेटकर यांच्याशी झालेल्या संवादातून ‘अनंत अमुचि ध्येयासक्ती अनंत अन आशा’ या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या काव्यपंक्तीचा प्रत्यय सर्वांना आला.

हिंदू महिला सभेच्या वतीने ज्येष्ठ क्रीडासंघटक डॉ. अरुण दातार यांच्या हस्ते पॅरा-ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांना साहस पुरस्कार आणि स्वामीनिवास वृद्धाश्रमाच्या संस्थापका गौरी धुमाळ यांना लीलावती फळणीकर स्मृती सजग पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने सुमेधा चिथडे यांनी साधलेल्या संवादातून पेटकर यांचा खडतर जीवनप्रवास उलगडला. हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले या वेळी उपस्थित होत्या.

‘ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्याकडे पाहून चॅम्पियन व्हायचे, देशासाठी पदके मिळवायचे असे स्वप्न लहानपणीच बाळगले. पैलवानांच्या सहवासामुळे कुस्तीची आवड लागली. लष्करामध्ये सहभाग होऊन ऑलम्पिकपर्यंत जाता येते, असे सांगितल्यानुसार भारतीय लष्करात नोकरी केली. हॉकी, मुष्टियुद्ध असा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत देशाचे नेतृत्व करता आले. मात्र, १९६५ च्या युद्धात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. शत्रूुच्या नऊ गोळ्या माझी छाती, पोट, मणका शरीराची चाळण करून गेल्या. एक डोळा बदलावा लागला. दोन वर्षे कोमात होतो. त्यानंतर मला घडवणाऱ्या प्रशिक्षकांनी ‘चॅम्पियन कधी थांबत नसतात,’ असा गुरुमंत्र दिला. त्यातूनच प्रेरणा घेत परत लढायचे ठरवले. जलतरण, थाळीफेक, भालाफेक स्पर्धांमध्ये देशाचे नेतृत्व करताना पदके संपादन करण्यात यशस्वी झालो,’ अशा शब्दांत पेटकर यांनी जीवनप्रवास उलगडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. दामले यांनी प्रास्ताविक केले. वंदना जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.