पुणे : ई-हक्क प्रणालीमुळे गेल्या नऊ महिन्यांत विविध प्रकारचे एक लाख २१ हजार अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भूमी अभिलेख विभागाच्यावतीने ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना नोंदीसाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसून, घरात बसून अर्ज करता येणे शक्य झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांतून एक लाख २१ हजार ८९९ नागरिकांनी विविध नोंदीसाठी अर्ज केले आहेत. त्यात ९८ हजार २१५ अर्जांनुसार नोंदी मंजूर करण्यात आल्या असून, त्यानुसार प्रक्रिया करण्यात आल्या आहेत. २२ हजार अर्ज अपुऱ्या कागदपत्रांअभावी नामंजूर करण्यात आले आहेत. १६०४ नोंदी अद्याप प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सातबारा उताऱ्यावरील वारस नोंद, कर्ज बोजा दाखल करणे किंवा कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर (एकूण) नोंद कमी करण्यासारख्या नोंदीसाठी ‘ई हक्क’ प्रणाली महत्त्वाची ठरत आहे.
राज्याच्या महसूल विभागाने विविध सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. डिजिटल सातबारा उतारा, ई फेरफार अशा विविध सेवांचा समावेश आहे. त्या पुढे जाऊन आता तलाठ्याच्या कार्यालयात हेलपाटे मारायला लागू नये, यासाठी सरकारने वारस नोंद, कर्जाचा बोजा दाखल करणे यासारख्या विविध नोंदीसाठी ई हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. मृत व्यक्तीनंतर त्यांच्या वारसाची नोंद घेण्यासाठी नागरिकांनी pdeigr.maharastra.gov.in. य़ा वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. हा अर्ज संबंधित तलाठ्याकडे पाठविला जाईल. तलाठी या अर्जाची ऑनलाइन पडताळणी करतील. कागदपत्रे अपूर्ण असेल, तर त्याची माहिती अर्जदाराला मेलद्वारे कळविण्यात येईल. सर्व कागदपत्रे पूर्ण असतील, तर तलाठी त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर घेणार असल्याची माहिती कूळ कायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिली.