पुणे शहरात स्वाइन फ्ल्यूने पुन्हा डोकेवर काढल्याचे दिसत आहे. मंगळवारी आणखी एका रूग्णाचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाला. मागील दोन महिन्यातील हा सातवा बळी ठरला आहे.
पुणे शहरांत एक जानेवारीपासून आजअखेर १ लाख ५६ हजार ११४ रुग्णांनी या आजाराची तपासणी केली. या दरम्यान १ हजार ५१९ संशयित आढळल्याने त्यांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देऊन उपचार सुरु करण्यात आले. या आजाराने वर्षाच्या सुरुवातीपासून आज अखेर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्वाइन फ्ल्यूने थैमान घालण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.