मित्राचा वाढदिवस साजरा करून परतत असताना भरधाव मोटार पुलाच्या कठडय़ाला धडकून झालेल्या अपघातात बीएमसीसी महाविद्यालयातील एक विद्याथी ठार झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. कात्रज बायपास रस्त्यावरील पोतदार स्कूलसमोरील भुयारी मार्गाच्या पुलावर शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात झाला.
सिद्धांत राहुल हरिभक्त (वय १९, रा. सुंदरनगर, कात्रज- कोंडवा रस्ता) हा विद्यार्थी अपघातात ठार झाला आहे. अक्षय दिलीप कोमटवार (वय २०, माणिकबाग, सिंहगड रस्ता), गीतेश शेखर माळजे (वय १८, रा. सदाशिक पेठ), आदित्य मिलिंद बाविसकर (वय २१, रा. सदानंद सोसायटी, कोथरूड), मंदार किरण शहा (वय १८, रा. कोथरूड) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे.
शुक्रवारी रात्री हे सर्वजण एका मित्राच्या वाढदिवसासाठी बाविसकर याच्या मोटारीतून गेले होते. तेथून परतत असताना बाविसकर याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार पुलाच्या कठडय़ाला धडकली व पलटी झाली. कारचा अक्षरश: चुराडा झाला, तर मोटारीचे इंजिन तुटून पडले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचही जणांना रुग्णालयात पोहोचविण्यात आले, मात्र सिद्धांतचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2014 रोजी प्रकाशित
‘बीएमसीसी’तील विद्यार्थ्यांच्या मोटारीच्या अपघातात एक ठार
मित्राचा वाढदिवस साजरा करून परतत असताना भरधाव मोटार पुलाच्या कठडय़ाला धडकून झालेल्या अपघातात बीएमसीसी महाविद्यालयातील एक विद्याथी ठार झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

First published on: 30-03-2014 at 02:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One died in road accident