तळेगाव-चाकण रस्त्यावर टेम्पो आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव येथून सेन्टरिंगचे काम आटोपून टेम्पोमध्ये बसून बांधकाम कामगार चाकणच्या दिशेने जात होते. मात्र, भरधाव वेगात असलेला टेम्पो ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भर रस्त्यात पलटी झाला, आणि तळेगावच्या दिशेने जाणाऱ्या कारवर जाऊन जोरात आदळला. या भीषण अपघातात टेम्पोमधील एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याचबरोबर इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पोमध्ये लोखंडी साहित्य होते तसेच कामगारही होते.
या प्रकरणाचा अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.