गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यामुळे त्याचा भाव आला आहे. किरकोळ बाजारामध्ये सोमवारी ८० रुपये किलो दराने विक्री झाली असून कांद्याच्या दराने सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल हा दराचा टप्पा ओलांडला. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये कांद्याचा दर ५,८०० रुपये क्विंटल असा होता.
गरवी कांद्याचा हंगाम संपत आला आहे. श्रावण महिना संपल्यामुळे स्थानिक बाजारपेठेतून कांद्याला मागणी वाढली आहे. केरळसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये कांद्याला चांगली मागणी असल्याने ही दरवाढ झाली आहे. पावसामुळे आंध्र प्रदेश आणि उत्तर कर्नाटकामध्ये कांद्याची उशिरा लागवड झाली आहे. उत्पादनामध्ये घट झाली असून नवीन कांद्याची आवक देखील लांबणीवर पडली आहे. या साऱ्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला असून भविष्यामध्ये कांद्याला आणखी भाव येणार आहे.
मार्केट यार्डमध्ये सोमवारी ६ हजार ३७२ क्विंटल कांद्याची आवक झाली. गेल्या वर्षी याच दिवशी ११ हजार क्विंटल कांदा उपलब्ध झाला होता. गेल्या वर्षी क्विंटलला असलेला ७५० रुपये हा दर यंदा ५,८०० रुपयांपर्यंत पोहोचला. त्यामुळे किरकोळ बाजारातील कांद्याचा दर प्रतिकिलो ७० ते ८० रुपये झाला.
भेळेतून कांदा गायब
कांद्याच्या वाढत्या दरामुळे भेळेमधून कांदा गायब होत आहे. कांद्याशिवाय भेळ खाण्यामध्ये मजा नाही. पण, कांदा घालून भेळ देण्यासाठी विक्रेते पाच रुपये जादा मागत असल्याची माहिती एका गृहिणीने दिली.