कांदा, बटाटा, लसूण, आल्याचे चढे भाव कायम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून घाऊक तसेच किरकोळ बाजारात कांदा, बटाटा, लसूण आणि आल्याचे भाव वाढले आहेत. दैनंदिनी वापरात असलेल्या या फळभाज्यांच्या वाढीव भावामुळे गृहिणींचे स्वयंपाकघरातील गणित बिघडले आहे. अन्य सर्व फळभाज्यांच्या दरात मात्र दहा ते वीस टक्कय़ांनी घट झाली.

गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी सव्वादोनशे ट्रक फळभाज्यांची आवक झाली. एरवी घाऊक बाजारात आठवडय़ातील प्रत्येक रविवारी साधारणपणे १६० ते १८० ट्रक एवढी फळभाज्यांची आवक होती. आवक वाढल्यामुळे कांदा, बटाटा, लसूण, आले वगळता सर्व फळभाज्यांच्या दर उतरले आहेत. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने अनेक भागातील पिकांचे मोठे नुकसान होत होते. मात्र, गेल्या आठवडय़ात काही भागात तुरळक पाऊस झाल्याने पिके वाचली. त्यामुळे शेतीमालाची आवक वाढल्याचे घाऊक बाजारातील प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशमधून एक ट्रक मटार, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधून कोबी दहा ते बारा ट्रक, इंदूरहून सात ते आठ टेम्पो गाजर, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून सहा ते आठ टेम्पो शेवगा, गुजरात, कर्नाटकातून वीस टेम्पो हिरवी मिरची अशी आवक परराज्यातून रविवारी घाऊक बाजारात झाली. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून सातारी आले पंधराशे ते सोळाशे गोणी, पुरंदर, वाई, पारनेर आणि सातारा भागातून मटार पाचशे ते सहाशे गोणी, कोबी दहा ते बारा टेम्पो, तांबडा भोपळा दहा ते बारा टेम्पो, भुईमूग शेंग दोनशे पोती, पावटा आठ ते दहा टेम्पो, शेवगा चार ते पाच टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी दहा ते पंधरा टेम्पो, शेवगा चार ते पाच टेम्पो, टोमॅटो साडेचार ते पाच हजार पेटी, कांदा दीडशे ट्रक, इंदूर, आग्रा, गुजरात आणि तळेगाव भागातून बटाटा सत्तर ते पंचाहत्तर ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसूण पाच ते साडेपाच हजार गोणी अशी आवक झाली. सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे.

संत्रा, मोसंबी, लिंबे महागली

फळबाजारात मोसंबी आणि संत्र्याची आवक वाढली आहे. श्रावण महिन्यात अनेक जण उपवास करतात. तसेच घरोघरी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे मोसंबी, संत्र्याच्या दरात दहा टक्कय़ांनी वाढ झाली. मागणी कमी झाल्याने पेरूचे दर कमी झाले आहेत. केरळहून चार ट्रक अननस, मोसंबी साठ टन, संत्रा तीन टन, डाळिंब ऐंशी ते शंभर टन, पपई पंधरा ते वीस टेम्पो, लिंबे सहा ते सात हजार गोणी, चिक्कूची चारशे खोकी, पेरू अडीचशे पाटी, कलिंगड दहा ते बारा टेम्पो, सफरचंद अडीच ते तीन हजार पेटी, खरबूज सात ते आठ टेम्पो, आंबा, प्लम, नासपती आणि पिअर्स  या फळांची आवक बाजारात झाली तसेच सीताफळाची चार ते साडेचार टन एवढी आवक झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onions potatoes garlic and ginger prices continued to grow
First published on: 14-08-2017 at 01:09 IST