राज्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी (एमबीए) प्रवेश मिळवणे इतके सोपे झाले आहे की प्रवेश परीक्षेत ४०० पैकी अवघा एक गुण मिळाला तरी त्याला प्रवेश मिळवणे शक्य बनले आहे. या वर्षीच याचा प्रत्यय आला असून, दहाच्या आत गुण मिळालेल्या तब्बल २०७ विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करणे शक्य होणार आहे. उपलब्ध जागांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी निम्मेच अर्ज तसेच, तंत्र शिक्षण संचालनालयाने किमान गुणांचा अट न ठेवल्याने राज्यात हे चित्र पाहावे लागत आहे.
देशभरातील व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे प्रवेश हे सीमॅट, कॅट, मॅट या परीक्षांच्या माध्यमातून करण्याच्या निर्णयाची या वर्षीपासून अंमलबजावणी करण्यात आली. गेल्या वर्षीपर्यंत सीईटीच्या माध्यमातून व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे प्रवेश होत होते. गेल्या वर्षीपर्यंत सीईटीमध्ये २४० पैकी किमान ३० गुण असलेले विद्यार्थीच व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी पात्र ठरत होते. या वर्षी सीमॅटच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात आले आहेत. मात्र, व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी राज्यातील एकूण प्रवेश क्षमतेच्या पन्नास टक्केच अर्ज आल्यामुळे ‘गुणवत्ता’ ही संकल्पनाच शिल्लक राहिलेली नाही. या वर्षी सिमॅट मध्ये ४०० पैकी १ गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाही व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. असे सहा विद्यार्थी आहेत. सिमॅट परीक्षेसाठी राज्यातील सर्वोत्तम गुण हे ४०० पैकी २१४ आहेत. यंदा गटचर्चा आणि मुलाखतीची चाळणीही वगळण्यात आली आहे.
या वर्षी राज्यात एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या ४५ हजार ७४१ जागा आहेत, तर ११ हजार ६८५ जागा या पदव्युत्तर पदविका म्हणजे (पीजीडीएम) अभ्यासक्रमासाठी आहेत. मात्र, या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी फक्त २० हजार ७५७ अर्ज आले होते. त्यामुळे संस्थाना प्रवेश परीक्षांच्या चाळण्यांमधून आलेले गुणवान विद्यार्थी तर सोडाच, पण विद्यार्थी मिळणेही मुश्किल झाले आहे. मुंबई, पुण्यातील संस्थांची परिस्थिती तुलनेने बरी असली, तरी राज्यातील इतर भागात अनेक संस्थांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून फक्त ८ किंवा १० विद्यार्थी मिळाले आहेत. काही संस्थांना तर एकही विद्यार्थी मिळालेला नाही.
एक गुणाच्या विद्यार्थ्यांना मिळालेली महाविद्यालये-
जयवंत इन्स्टिटय़ूट, वाठार (सातारा)
ज्ञानगंगा कॉलेज नऱ्हे (पुणे)
अलकेश दिनेश मोदी महाविद्यालय, मुंबई
अमृतवाहिनी इन्स्टिटय़ूट, संगमनेर (नाशिक)
सिद्धांत इन्स्टिटय़ूट, पुणे
जयवंतराव सावंत इन्स्टिटय़ूट, हडपसर (पुणे)

———

‘‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने किमान गुणांची अट ठेवलेली नाही. त्याचबरोबर उपलब्ध जागांपेक्षा अर्ज कमी आल्यामुळे कमी गुणाच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळाले आहे.’’
– डॉ. सुभाष महाजन, तंत्रशिक्षण संचालक

 ———

‘‘खासगी संस्थांची प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये होते व जूनमध्ये महाविद्यालये सुरूही होतात. त्यामुळे गुणवत्ता असलेले बहुतांश विद्यार्थी या संस्थांमध्ये जातात. मात्र, शासकीय संस्थांची प्रवेश प्रक्रिया जुलै-ऑगस्टपर्यंत पूर्ण होत असल्याने त्यांना गुणवत्ता असलेले विद्यार्थी मिळत नाहीत आणि जे येतील त्यांना प्रवेश देण्याची वेळ येत आहे.’’
– डॉ. चंद्रशेखर चितळे, पुणे विद्यापीठ व्यवस्थापन अभ्यासक्रम विभाग (पुम्बा)