मी ज्योतिषशास्त्र मानतो.. कायम पांढऱ्या रंगाचे कपडे वापरतो ते ज्योतिषाच्या सल्ल्यामुळेच.. शिक्षणसंस्था, अभिमत विद्यापीठाची मान्यता एवढेच नाही तर चांगल्या ठिकाणी विवाहयोग जुळून आला तोही ज्योतिषामुळे.. ही मुक्ताफळे उधळली आहेत िपपरी येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील यांनी. अर्थात ज्योतिषावरील श्रद्धा ही आपली वैयक्तिक बाब असून त्याचे प्रतििबब संमेलनात पडणार नाही याची खबरदारी घेतली असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार युवा मंचच्या वतीने डॉ. पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे या वेळी उपस्थित होते.
एका ज्योतिषाने सांगितले म्हणून कायम पांढरे कपडे वापरतो. शिक्षण संस्था सुरू करावी असा सल्लाही त्या ज्योतिषाने दिला होता. हा सल्ला आचरणात आणल्याने यशस्वी झालो. एका ज्योतिषाने भावी सासऱ्यांना कुंडली दाखवली आणि त्यातून विवाहाचा योग जुळून आला, असे सांगून पाटील म्हणाले, बंगळुरू येथील एका स्वामींनी विद्यापीठाला अभिमत दर्जा मिळण्यासाठी त्यासाठी अर्ज करण्याची सूचना केली होती. त्यानुसार अर्ज केल्यावर तीनच महिन्यात केंद्रीय समिती पाहणीसाठी आली. समितीच्या पाहणीनंतर काही दिवसांतच मान्यतेचे पत्रही आले. माझ्या श्रध्दास्थानांची मोठी छायाचित्रे आपल्या कार्यालयांमध्ये लावलेली आहेत. त्यातून चांगले अनुभव आले आहेत. स्वागताध्यक्ष असलो उगाचच टीका होऊ नये या उद्देशातून संमेलनात कोणत्याही बाबा-बुवांना निमंत्रण दिलेले नाही. त्यांच्यावरील श्रध्दा ही आपली वैयक्तिक बाब आहे.
सुनील चाबुकस्वार यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी िशदे यांनी सूत्रसंचालन केले.
संमेलनातील मान्यवर
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ज्येष्ठ कवी-गीतकार गुलजार, त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील उपस्थित राहणार आहेत. तर, समारोप सत्रासाठी केंद्रीय मंत्री वाहतूकमंत्री नितीन गडकरी, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ कवी-गीतकार जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळ संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या १२ फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. आशा भोसले संगीत रजनी, अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर तसेच शरद पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे. याशिवाय, सहा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक संमेलनात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. पी. डी. पाटील यांनी यावेळी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2015 रोजी प्रकाशित
शिक्षणसंस्था, अभिमत विद्यापीठ केवळ ज्योतिषामुळेच!-पी. डी. पाटील
मी ज्योतिषशास्त्र मानतो.. कायम पांढऱ्या रंगाचे कपडे वापरतो ते ज्योतिषाच्या सल्ल्यामुळेच.. ही मुक्ताफळे उधळली आहेत डॉ. पी. डी. पाटील यांनी.
Written by दया ठोंबरे
First published on: 07-12-2015 at 02:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P d patil says