मंदिराच्या गाभाऱ्यात घुमतात तसे पखवाजच्या साथीने घुमणाऱ्या धृपद-धमार गायकीचे सूर.. भर माध्यान्हीच्या वेळी हरिजींच्या मधुरमय बासरीवादनातून आल्हाद देणारी ‘सारंग’ची सुरावट.. ढंगदार आलापींना मिळणारी दाद आणि बासरी-तबला यांच्यामध्ये समेवर येताना होणारी  जुगलबंदी.. अशा बहारदार मैफलींनी रविवारची ‘नाद’मय सकाळ रसिकांनी अनुभवली.
मधुकंस, पुणे आणि नाद संस्थेतर्फे प्रसिद्ध धृपदगायक पं. उदय भवाळकर यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित ‘नाद उत्सवा’मध्ये ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते भवाळकर यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ धृपदगायक उस्ताद सईदुद्दीन डागर, ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर, प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, तबलावादक रामदास पळसुले आणि धनंजय बर्वे या वेळी उपस्थित होते. पूर्वार्धात उदय भवाळकर यांचे गायन आणि उत्तरार्धात पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे बासरीवादन झाले.
गुरूंकडून मिळालेले ज्ञान ग्रहण केले. हे ज्ञान ज्यांना शिकायचे त्यांना द्यायचे हे सूत्र लक्षात ठेवून आजवर काम करीत आलो, अशी भावना व्यक्त करीत उदय भवाळकर यांनी अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा, अशी इच्छा प्रदर्शित केली.
अमोल पालेकर म्हणाले, संगीतावर बोलावे एवढा माझा अधिकार नाही. पण, एक कलाकार आणि रसिक म्हणूनही सध्या आजूबाजूला जो हलकल्लोळ सुरू आहे आणि ध्वनिप्रदूषण एका उंचीला पोहोचले आहे हे जाणवते. अशा वातावरणात धृपद संगीतच मनाला शांती देते. कोणताही अभिनिवेश न ठेवता आपल्या कलाविष्कारातून श्रोत्यांना सहज काबीज करण्याचे सामथ्र्य उदय यांच्या गायकीमध्ये आहे.
उदय भवाळकर यांनी आपल्या गायनातून ‘कोमल ऋषभ आसावरी’ या रागाचे सौंदर्य उलगडले. त्यांना पं. माणिक मुंडे यांनी पखवाजची तर, सागर मोराणकर आणि चिंतन उपाध्याय यांनी तानपुऱ्यासह स्वरसाथ केली. पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी ‘सारंग’ राग आपल्या वादनातून फुलविला. त्यांना योगेश समसी यांनी तबल्याची तर, सुनील अवचट आणि विवेक सोनार यांनी बासरीची साथसंगत केली.