पुणे : ‘शहरातील उड्डाणपुलांच्या खाली असलेल्या मोकळ्या जागांमध्ये वाहने लावण्यास बंदी घालण्याचा विचार महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाने सुरू केला आहे. उड्डाणपुलाखाली वाहने लावण्यात येत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत असल्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जाईल. नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीत तथ्य आढळल्यास तेथे पार्किंगला बंदी करण्याचा निर्णय घेतला जाईल,’ असे वाहतूक नियोजन विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी स्पष्ट केले.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेने शहरात १८ उड्डाणपूल उभारले आहेत. या उड्डाणपुलांच्या खाली असलेल्या मोकळ्या जागांमध्ये चारचाकी, दुचाकी वाहने लावली जातात. धायरी येथील उड्डाणपुलाखाली असलेल्या मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचे पार्किंग केले जात होते. त्याच्या काही तोंडी तक्रारी आल्यानंतर तेथील पार्किंग बंद करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहरातील इतर उड्डाणपुलांच्या खाली केल्या जाणाऱ्या पार्किंगबाबत तक्रारी आल्यास त्याची शहानिशा करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पावसकर यांनी सांगितले.
नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील धायरी फाटा येथे महापालिकेने दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या नावाने उड्डाणपूल बांधला आहे. या उड्डाणपुलाखाली गेल्या अनेक वर्षांपासून दुचाकी लावल्या जात होत्या. यामुळे धायरी, नऱ्हे या भागातील रहिवाशांची सोय होत होती. तसेच, या भागात राहणारे आणि हिंजवडी आयटी पार्कसह अन्य ठिकाणी कामाला जाणारे तरुण या उड्डाणपुलाखाली गाडी लावून जात होते. काही स्थानिकांनी याची तक्रार केल्याने महापालिकेने तेथील पार्किंग बंद केले आहे. महापालिकेच्या या निर्णयाबाबत अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील इतर उड्डाणपुलांच्या खाली होत असलेल्या पार्किंगबाबत महापालिकेचे वाहतूक नियोजन विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘धायरी येथील उड्डाणपुलाच्या खाली होत असलेल्या पार्किंगबाबत नागरिकांनी फोनवरून तक्रार केली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांबरोबर पाहणी करून येथील पार्किंग बंद केले आहे. शहरातील अन्य उड्डाणपुलांखालील पार्किंगसंबंधात तक्रार आल्यास तेथे पाहणी करून पार्किंग बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल.’
उड्डाणपुलाच्या खाली लावण्यात येत असलेल्या वाहनांच्या पार्किंगबाबत तक्रारी आल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जाईल. नागरिकांना त्रास होत असल्यास वाहनांचे पार्किंग बंद केले जाईल. – अनिरुद्ध पावसकर, वाहतूक नियोजन विभागप्रमुख