‘पॅरोल’, ‘फलरे’ च्या रजेवर सोडलेले पुणे, पिंपरी-चिंचवडमधील २२ कैदी फरार

कारागृहात शिक्षा भोगत असताना संचित (पॅरोल) आणि अभिवचन (फलरे) रजेवर सोडण्यात आलेले २२ कैदी कारागृहात परत न जाता पळून गेल्याचे समोर आले आहे.

विविध गुन्ह्य़ांमध्ये कारागृहात शिक्षा भोगत असताना संचित (पॅरोल) आणि अभिवचन (फलरे) रजेवर सोडण्यात आलेले पुणे व पिंपरी-चिंचवडमधील तब्बल २२ कैदी कारागृहात परत न जाता पळून गेल्याचे समोर आले आहे. याबाबत शहर पोलिसांकडून विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांचा तपास सुरू केला आहे. या २२ कैद्यांपैकी सात कैदी अभिवचन रजेवरील तर सोळा कैदी संचित रजेवर बाहेर आलेले आहेत.
कारागृहातील शिक्षा झालेल्या कैद्यांना पॅरोल आणि फलरे अशा दोन प्रकारच्या रजेवर बाहेर सोडले जाते. यातील फलरे रजा ही प्रत्येक कैद्याचा अधिकार असतो. शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यानंतर त्याची वर्तणूक आणि स्थानिक पोलिसांचा अहवाल मागवून कैद्यांना ही रजा दिली जाते. कारागृह महानिरीक्षक चौदा दिवसांची संचित रजा देऊ शकतात. त्यामध्ये पुन्हा चौदा दिवसांची वाढ करण्याचा त्यांना अधिकार आहे. तर, पॅरोल रजा ही कैद्याचे नातेवाईक आजारी असेल किंवा कार्यक्रम असेल तर विभागीय आयुक्तांकडून दिली जाते. कैद्याच्या कुटुंबातील व्यक्ती आजारी आहे किंवा त्याच्या घरी एखादा महत्त्वाचा कार्यक्रम आहे, अशा वेळी कैदी पॅरोलसाठी अर्ज करू शकतो. पॅरोल देण्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल असलेल्या पोलीस ठाण्याचा अहवाल, कारागृहातील त्याचा वर्तणूक अहवाल, त्याचे नातेवाईक आजारी असेल तर त्याचा अहवाल हा संबंधित विभागीय आयुक्तांकडे पाठविला जातो. ते पाहून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्याला सात ते तीस दिवसांपर्यंत संचित रजा मंजूर केली जाते. या संचित रजेमध्ये वाढ करायची असेल तर पुन्हा ही प्रक्रिया पार पाडावी लागते.
पुणे पोलिसांकडे असलेल्या उपलब्ध अकडेवारीनुसार, पुणे शहरातील फलरेवर बाहेर आलेले सात कैदी फरार आहेत. त्यापैकी एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. फरार झालेले सहाही कैदी येरवडा कारागृहातील असून त्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पॅरोलवर सोडलेले सोळा कैदी फरार आहेत. त्यापैकी चौदा कैदी हे येरवडा कारागृहातील आहेत. तर एक कळंबा आणि दुसरा नाशिक कारागृहातील आहे. फरार झालेल्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या फरार कैद्यांचा तपास घेण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात तयार केलेल्या विशेष पथकामार्फत त्यांचा तपास केला जात आहेत, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत कैद्यांची नावासह माहिती पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Parole yerwada jail farlo prisoner crime