पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्क आणि बोपोडी येथील जमीन व्यवहार प्रकरणांतील कुलमुख्त्यारधारक शीतल किसनचंद तेजवानी हिने परदेशात पलायन केल्याची चर्चा आहे. मात्र, तेजवानी पसार झाल्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. या दोन्ही प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या ‘अमोडिया’ कंपनीचा बोपोडीतील आणखी एक जमीन व्यवहार उघडकीस आला. बोपोडी आणि कोरेगाव पार्क या दोन्ही प्रकरणांत तेजवानी हिच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस तिचा शोध घेत आहेत. तिने परदेशात पलायन केल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. ‘हे प्रकरण फसवणुकीचे आहे. फसवणूक, अपहार प्रकरणात आरोपी अटकपूर्व जामीन मिळवू शकतात. या प्रकरणांतील तेजवानी ही परदेशात पसार झाल्याची चर्चा आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळालेली नाही’, असे आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ‘या जमीन गैरव्यवहार प्रकरणांचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणांतील कागदपत्रे शासकीय विभागाकडून मागविण्यात आली आहे. या कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे’ अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलता दिली.

‘मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती पुढे आणावी’

अकोला : पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन प्रकरण गंभीर विषय असल्याचे मुख्यमंत्री सांगतात. या प्रकरणात त्यांनी सखोल चौकशी करून वास्तव चित्र समाजापुढे ठेवले पाहिजे. हे काम त्यांनीच करण्याची अपेक्षा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केले. शरद पवार म्हणाले, पुण्यातील जमीन प्रकरणात शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत केली. त्या समितीला एक महिन्याची मुदत दिली आहे. चौकशीतून नेमके काय समोर येते, ते बघावे लागेल प्रशासन, राजकारण आणि कुटुंब यात फरक आहे. राजकारणात कुटुंब आणत नाही, ही आमची विचारधारा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

‘जमिनीसाठी कोणते कष्ट घेतले?’

परभणी : शेतकऱ्यांना सगळे फुकट पाहिजे असे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला मात्र हातपाय न हलवता बेकायदारीत्या कोट्यवधी रुपयांची जमीन फुकटात हवी आहे, असे म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शनिवारी टीका केली. देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचाराला ‘निर्दोषत्व’देणारे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे याही प्रकरणात काहीच होणार नाही. अशी प्रकरणे जिरवण्यासाठीच सत्तेत येण्याकरिता या सरकारला मतचोरीशिवाय पर्याय नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. ठाकरे यांनी शनिवारी परभणी जिल्ह्यातील ताडबोरगाव येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

चिरंजीवाच्या ‘प्रतापा’मुळे अडचणीत

छत्रपती संभाजीनगर : मुलाने केलेल्या व्यवहारामुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे फडणवीस सरकारमधील दुसरे नेते ठरले आहेत. समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीने हॉटेल ‘विट्स’साठी केलेले गैरव्यवहार त्यांच्या अंगाशी आला होता.

जमीन गैरव्यवहारांची श्वेतपत्रिका काढा : सपकाळ

मुंबई : सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी राज्य लुटण्याचा सपाटा लावला असून मुंबई, पुण्यासह राज्यातील कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल दराने लाटले जात आहेत. या सर्व जमीन गैरव्यवहारांची श्वेतपत्रिका काढावी आणि हिवाळी अधिवेशनात एक दिवस सरकारने चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केली.