मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ते पिंपरी-चिंचवड शहरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत (शनिवारी) बोलत होते. ‘तो’ एक मोदी गुजरात भारतभर मांडू शकतो तर पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रभर का नाही मांडू शकत, असं पार्थ पवार म्हणाले. तसेच आजोबा शरद पवार यांना आपल्याला पंतप्रधान करायचंय, कामाला लागा असे आवाहनही यावेळी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पार्थ अजित पवार पहिल्या भाषणामुळे चांगलेच सोशील मीडियावर ट्रोल झाले होते. त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करत वडगाव मावळ येथे माध्यमांशी बोलताना आपण काम जास्त आणि कमी बोलतो असा विरोधकांना टोला लगावला होता. त्यानंतर त्यांच्यात भाषण शैली आणि वक्तृत्व असल्याचं बोललं जातं होत. परंतु,(शनिवारी) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पार्थ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा एकेरी उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ते पुन्हा एकदा ट्रोल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पार्थ पवार हे कार्यकर्त्याना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना म्हणाले, पिंपरी-चिंचवडचा विकास महाराष्ट्रभर मांडला नाही अस माझा मित्र म्हणत आहे. ‘तो एक मोदी’ गुजरात भारतभर मांडू शकतो तर पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रभर का मांडू शकत नाही तेच मला कळत नाही असे ओघाच्या भरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला. पुढे ते म्हणाले, गेल्या दहा दिवसांत मला काहीच कळत नाही. की,काय चाललंय, कार्यकर्त्यानी खूप प्रेम दिलं आहे.१८ वर्षाचा असताना शहरात काम सुरू केलं असते, तर लग्न पण झालं असते उगाचच मुंबईमध्ये वेळ घालवला. आता आपल्याकडे केवळ ३५ दिवस राहिले आहेत.आपल्याला सर्वाना एकत्र राहून काम करायचं. खास करून तरुण वर्गाला आपल्या शहरातील विकास दाखवा ते कन्फ्युज आहेत. मतभेद विसरून जाऊयात आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे, असे पार्थ पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parth pawar taking about development of pimpri and gujrat model
First published on: 24-03-2019 at 10:49 IST