विद्याधर कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महाभारताच्या सांस्कृतिक ज्ञानकोशा’च्या तिसऱ्या खंडातील दुसरा भाग

‘महाभारताचा सांस्कृतिक ज्ञानकोश’ या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या ‘व्यक्तिविशेष’ या तिसऱ्या खंडातील दुसरा भाग अभ्यासकांसाठी खुला झाला आहे. महाभारतातील व्यक्तिरेखांचा अंतर्भाव असलेल्या या भागात ‘अ’ पासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. मात्र हा भाग  अर्जुन या व्यक्तिरेखेनेच व्यापला आहे.

भांडारकर संस्थेच्या स्थापनेपासून अर्धशतकाहून अधिककाळ विद्वानांनी योगदान देत ‘महाभारताची चिकित्सक आवृत्ती’ (सीलेक्टिव्ह एडिशन) साकारली. हे काम पूर्णत्वास जात असतानाच संस्थेने महाभारताचा विविधांगी अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून ‘महाभारताचा सांस्कृतिक ज्ञानकोश’ (कल्चरल इंडेक्स) हा प्रकल्प हाती घेतला. विमलाबाई नीळकंठ जठार चॅरिटेबल ट्रस्टने या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच अर्थसाह्य़ केले. ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. म. अ. मेहेंदळे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली सांस्कृतिक ज्ञानकोशाचे दोन खंड साकारले गेले.

सांस्कृतिक ज्ञानकोशाच्या या दोन खंडांमध्ये प्रामुख्याने महाभारतामध्ये उल्लेख असलेल्या भौगोलिक भागातील नद्या, पर्वत, तीर्थस्थाने आणि शस्त्रास्त्र या विषयांची सूची संकलित करण्यात आली आहे. वयोमानानुसार प्रकृती साथ देत नसल्यामुळे डॉ. मेहेंदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ अभ्यासक डॉ. ग. उ. थिटे यांच्याकडे संपादकपदाची धुरा आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिसऱ्या खंडाचे काम सुरू झाले आहे. ‘व्यक्तिविशेष’ या खंडातील पहिल्या दोन भागांमध्ये ‘अ’ पासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तिरेखांची सूची संकलित करण्यात आली आहे. या भागाच्या प्रकाशनासाठी रावबहादूर गणेश नारायण खरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांची कन्या विनोदिनी सहस्रबुद्धे यांनी अर्थसाह्य़ केले आहे. भांडारकर संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (६ जुलै) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या भागाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

डॉ. ग. उ. थिटे म्हणाले,की भांडारकर संस्थेने महाभारताची चिकित्सक आवृत्ती साकारली. खरे तर येथून महाभारताच्या अभ्यासाचा प्रारंभ होतो. महाभारत या महाकाव्याचा विविधांगी पैलूंनी अभ्यास व्हावा या उद्देशातून महाभारताचा सांस्कृतिक ज्ञानकोश साकारण्याची संकल्पना पुढे आली.  त्यासाठी डॉ. गौरी मोघे आणि डॉ. मैथिली जोशी यांचे सहकार्य लाभले आहे. अशाच पद्धतीने महाभारतातील राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कला अशा विविध पैलूंचा मागोवा सांस्कृतिक ज्ञानकोशामध्ये घेतला जाणार आहे.

व्यक्तीविशेष भागामध्ये काय?

महाभारत म्हटल्यानंतर आपल्याला धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या पांडवांसह भीष्म, धृतराष्ट्र, गांधारी, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कृष्ण, द्रौपदी, कुंती, दुयरेधन, दु:शासन, शकुनी एवढय़ाच व्यक्तिरेखांची माहिती असते. मात्र, कित्येक व्यक्तिरेखा आपल्याला माहितीच नाहीत. काही व्यक्तिरेखांचा केवळ  नामोल्लेख आहे,तर काही व्यक्तिरेखांविषयी त्रोटक स्वरूपात माहिती उपलब्ध आहे. व्यक्तिविशेष या खंडामध्ये त्या व्यक्तिरेखांची कथनाक आणि उपकथानकानुसार नोंद करण्यात येत आहे, असेही थिटे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Particular section is open for study pune abn
First published on: 05-07-2019 at 00:43 IST