scorecardresearch

पुणे सिकंदराबाद शताब्दीतूनही पारदर्शक प्रवासाची अनुभूती ; मध्य रेल्वेच्या ‘व्हिस्टाडोम’ डब्यांना चांगला प्रतिसाद

चार गाड्यांनंतर आता पुणे- सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम डबा जोडण्यात आला आहे.

पुणे सिकंदराबाद शताब्दीतूनही पारदर्शक प्रवासाची अनुभूती ; मध्य रेल्वेच्या ‘व्हिस्टाडोम’ डब्यांना चांगला प्रतिसाद
पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसलाही बुधवारपासून (१० ऑगस्ट) व्हिस्टाडोम हा पारदर्शक डबा जोडण्यात आला

पुणे : पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसलाही बुधवारपासून (१० ऑगस्ट) व्हिस्टाडोम हा पारदर्शक डबा जोडण्यात आल्याने या गाडीतूनही प्रवाशांना पारदर्शी प्रवासात निसर्गाची अनुभूती घेता येणार आहे. व्हिस्टाडोम प्रकारातील डबा जोडण्यात आलेली मध्य रेल्वेची ही पाचवी गाडी आहे. प्रवाशांकडून या डब्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत ३२ हजार प्रवाशांनी या डब्यातून प्रवास केला असून, त्यातून मध्य रेल्वेला ३.९९ कोटींचा महसूल मिळाला आहे.

मध्य रेल्वेकडून यापूर्वी पुणे-मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम प्रकारातील डबे जोडण्यात आले आहेत. या डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो मुंबई- गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधबे तसेच मुंबई- पुणे मार्गावरील पश्चिम घाटातील विलोभनीय निसर्ग या डब्यांतून प्रवाशांना अनुभवता येत आहे. या चार गाड्यांनंतर आता पुणे- सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम डबा जोडण्यात आला आहे.

पुणे- सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमधून प्रवासी उजनी बॅकवॉटर आणि भिगवणजवळील धरणाचा आनंद घेतील. हा भाग परदेशी आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे विकाराबादजवळील अनंतगिरी टेकड्यांमधून जाताना जंगलातील निसर्गसौंदर्याचा आस्वादही प्रवाशांना घेता येईल. पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी सहा वाजता (मंगळवार वगळता) सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता सिकंदराबादला पोहोचेल. सिकंदराबाद – पुणे शताब्दी एक्सप्रेस सिकंदराबाद येथून दुपारी २.४५ वाजता (मंगळवार वगळता) सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.१० वाजता पुण्याला पोहोचेल.

व्हिस्टाडोम डब्यांची वैशिष्ट्ये

काचेचे छत असलेले डबे, रुंद खिडक्या, एलईडी दिवे, नव्वद अंशांत फिरविता येणारी आणि पुशबॅक आसने, अत्याधुनिक दरवाजे, गॅलरी आदी वैशिष्ट्यांमुळे प्रवासात आजूबाजूच्या निसर्गाची अनुभूती प्रवाशांना घेता येते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या