पर्यटक परवान्यावरील बसेसमध्ये प्रवाशांची यादी आणि माहिती ठेवणे आणि तपास अधिकाऱ्याने मागितल्यावर ती उपलब्ध करून देण्याच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना शासनाने प्रादेशिक आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पर्यटक परवान्यावर चालणाऱ्या बसेसमध्ये प्रवाशांचे नाव, पत्ता, वय अशी माहिती असलेली यादी असणे बंधनकारक आहे. या यादीची एक प्रत प्रवासाच्यावेळी वाहनामध्ये उपलब्ध असावी. तपासणी अधिकाऱ्याने मागणी केल्यानंतर ही प्रत दाखवणे बंधनकारक आहे. यादीची दुसरी प्रत परवाना धारकाकडे ठेवण्यात यावी. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना शासनाकडून सर्व प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
अलीकडेच मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे टुरिस्ट बसला झालेल्या अपघाताच्या पाश्र्वभूमीवर शासनाने हे परिपत्रक काढले आहे. अपघातातील जखमी किंवा मृत प्रवाशांच्या नातेवाइकांशी वेळीच संपर्क साधता यावा आणि आवश्यक ती तातडीची मदत देण्यासाठी प्रवाशांची यादी व त्यांचे तपशील महत्त्वाचे असल्याचे शासनाने या परिपत्रकात म्हटले आहे.