पुणे : पुणे विमानतळाचे विस्तारीकरण, आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे आणि नवीन टर्मिनल यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली असून, गेल्या वर्षभरात प्रथमच एक कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडला गेला आहे. त्यामध्ये प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासापेक्षा देशांतर्गत प्रवासाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

या विमानतळावरून २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये १०.६६ टक्के प्रवाशांची वाढ झाली आहे, तर विमान वाहतूक ७.५ टक्क्यांनी वाढली आहे. या विमानतळाचे विस्तारीकरण, उडाण योजनेंतर्गत देशांतर्गत उड्डाणे, आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे, नवीन टर्मिनलमुळे विमान वाहतूक वाढली आहे. तसेच, प्रवाशांसाठी असलेल्या डीजी यात्रा सुविधेमुळे हवाई प्रवासाला पसंती देण्यात आली आहे. या विमानतळावरून वर्षभरात एक कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नऊ लाख ५४ हजार प्रवाशांनी प्रवास केला, असून यामध्ये नऊ लाख २० हजार देशांतर्गत, तर ३३ हजार ३३७ आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांचा समावेश असल्याचे केल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विमानांच्या वाहतुकीतही ७.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत साडेचार हजार विमानांची उड्डाणे वाढली आहेत. गेल्या वर्षभरात या विमानतळावरून ६८ हजार ५५७ विमानांची वाहतूक झाली आहे. दरम्यान, या विमानतळावरून मालवाहतुकीत ८.८५ टक्के वाढ झाली आहे.

देशांतर्गत ३५ ठिकाणी उड्डाणे

पुणे विमानतळावरून सद्य:स्थितीत देशांतर्गत ३५ ठिकाणी उड्डाणे होत आहेत. भोपाळ, त्रिवेंद्रम, चेन्नई, इंदोर, अहमदाबाद, देहराडून येथे विमानसेवा सुरू करण्यात आल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे.

आगामी काळात पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.- संतोष ढोके, संचालक, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे विमानतळावरील प्रवासी वाहतुकीने प्रथमच एक कोटीहून अधिकचा टप्पा पार केला आहे. पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. भविष्यात वाढत्या प्रवाशांची संख्या पाहता विमानतळावर आणखी पायाभूत सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. – धैर्यशील वंडेकर, वाहतूक तज्ज्ञ