शनिवारी औंधमध्ये पारपत्र मेळावा

पुण्यासह अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरचे पारपत्र अर्जदारही या मेळाव्यात सहभागी होऊ शकतील.

प्रादेशिक पारपत्र कार्यालयातर्फे औंधमध्ये ब्रेमेन चौकाजवळ असलेल्या पं. भीमसेन जोशी सभागृहात ११ जुलै रोजी (शनिवार) पारपत्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सामान्य प्रक्रियेतून पारपत्रासाठी अर्ज केलेल्या ४५० अर्जदारांना या मेळाव्याचा लाभ घेता येईल. प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पुण्यासह अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरचे पारपत्र अर्जदारही या मेळाव्यात सहभागी होऊ शकतील. मेळाव्याच्या दिवशी उपस्थित राहण्यासाठी अर्जदारांना http://www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पारपत्रासाठीचा अर्ज आणि शुल्कही ‘ऑनलाइन’ भरावे लागेल. त्यानंतर अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीनेच भेटीच्या वेळा दिल्या जातील. मेळाव्यासाठी भेटीच्या वेळा देण्यास ९ तारखेला (गुरुवारी) दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. अर्जदार १२ वाजण्यापूर्वी अर्ज भरण्याचा टप्पा पूर्ण करू शकतील. अशा प्रकारे भेटीच्या वेळा मिळालेले अर्जदारच मेळाव्यास उपस्थित राहू शकणार असून त्यांनी आपला ‘अ‍ॅप्लिकेशन रेफरन्स नंबर’ (एआरएन) छापलेली प्रत, तसेच आवश्यक कागदपत्रे घेऊन येणे अपेक्षित आहे, असेही कार्यालयातर्फे कळवण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Passport aundh atul gotsurve