ज्यांच्या दुकानात गेल्यावर गोळ्यांपासून पुरणपोळीपर्यंत काय घेऊ आणि काय नको, असे होऊन जाते त्या ‘पाटणकर खाऊवाल्यां’ची हलव्यांचे तयार दागिने विकणारे अशी एक नवी ओळख बनली. हलव्यांचे दागिने बनवणारेही पुण्यात कमी नाहीत. पण त्यात मोठय़ा प्रमाणावर व्यवसाय करूनही नाजूकपणा आणि वैविध्य आणले ते पाटणकरांनीच!
‘पाटणकर खाऊवाल्यां’चे शनिपाराजवळचे दुकान माहीत नसलेले पुण्यात बहुदा कुणी नसेल! गोळ्या, चॉकलेट्स, बिस्किटे, लोणची, पापड, सातू पिठापासून गहू सत्त्वापर्यंतची सत्त्वे, लाडू, वडय़ा, पुरणपोळ्या, गुळाच्या पोळ्या.. या दुकानात काय मिळत नाही! पण हे नाव आणखी एका गोष्टीसाठी लोकप्रिय आहे. ते म्हणजे संक्रांतीला लहान बाळांना किंवा नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांना हौसेने घातले जाणारे हलव्यांचे दागिने. हलव्यांचे दागिने बनवणारेही पुण्यात कमी नाहीत, पण त्यात मोठय़ा प्रमाणावर व्यवसाय करूनही नाजूकपणा आणि वैविध्य जपले ते पाटणकरांनीच!
पाटणकरांच्या दुकानाच्या मूळच्या नावात ‘खाऊवाले’ नव्हतेच! वसंतराव पाटणकर यांनी ७५ वर्षांपूर्वी शनिपाराजवळ ‘पाटणकर आणि मंडळी’ या नावाने एक छोटे दुकान सुरू केले. हे दुकान होते गोळ्या-बिस्किटांसारख्या खाऊचे. प्रत्येक ग्राहकाला आणि त्यांच्या कुटुंबालाही नावानिशी ओळखणे ही वसंतरावांची खासियत. अनेक ग्राहक त्यांना प्रेमाने ‘गोडबोले’ किंवा ‘खाऊवाले’ अशी हाक मारत. यातले ‘खाऊवाले’ हळूहळू सर्वाच्याच तोंडी इतके रुळले, की ‘पाटणकर आणि मंडळी’च्या दुकानाने तेच नाव धारण केले. तो काळ समाजाच्या स्थित्यंतराचा. पापड, लोणची, मसाले आणि तत्सम अनेक पदार्थ विकतचे आणण्याकडे हळूहळू का होईना, पण कल दिसू लागला होता. लोकांच्या गरजा जशा बदलत गेल्या, तसे ‘खाऊवाल्यां’चे स्वरूप बदलले. पापडापासून तयार पिठे व भाजण्यांपर्यंतच्या गोष्टी तिथे विकत मिळू लागल्या. विशेष म्हणजे पाटणकर आयता माल खरेदी करून केवळ ‘रीपॅकिंग’ करत नव्हते, तर मालाचे स्वत: उत्पादन करत होते. आज जवळपास ९९६ खाद्यपदार्थ ते स्वत: बनवतात.
पूर्वीच्या अनेक स्त्रियांप्रमाणे वसंतरावांच्या पत्नी- रोहिणी पाटणकर याही संक्रांतीचा हलवा घरी करत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा हलवा करण्याचे तंत्र त्यांना उत्तम अवगत होते. ‘खाऊवाल्यां’च्या दुकानासाठीही त्या तो खूप मोठय़ा प्रमाणावर करवून घेत. पूर्वी बाजारात विकत मिळणारे हलव्यांचे दागिने काहीसे बोजड असत. तीळ, साबूदाणा किंवा मोठय़ा नायलॉनच्या साबूदाण्यावर हलवा तयार केला जाई. त्यामुळे दागिने जड होत. १९९३ मध्ये वसंतरावांचा मुलगा रमेश पाटणकर यांनी पत्नी सोनिया यांच्यासह दुकानात लक्ष घालण्यास सुरुवात केली. नवीन लग्न झालेल्या मुलींना हलव्याचे बोजड दागिने नको वाटतात, हे त्यांच्या लक्षात आले. तो काळ ‘इमिटेशन ज्वेलरी’चा. या दागिन्यांइतके नाजूक हलव्याचे दागिने करता येतील का, असा विचार सुरू केला. मग तीळ आणि साबूदाण्याबरोबर खसखस, काकडी बी, भोपळ्याच्या बिया, बदाम, काजू अशा विविध प्रकारचे हलवे त्यांनी हलव्याच्या दागिन्यांमध्ये वापरायला सुरुवात केली. असे नाजूक, रेखीव दिसणारे दागिने बाजारात फारसे कुठे उपलब्ध होत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये ती संकल्पना प्रचंड लोकप्रिय झाली.
हलवा बनवणे ही फार वेळखाऊ, हात भाजणारी आणि निगुतीनेच करण्याची गोष्ट! हलवा करण्यासाठी एक मोठी परात अगदी मंद आचेवर ठेवली जाते आणि त्यात एका वेळी किमान एक किलो जिन्नस (म्हणजे ज्यावर हलवा बनवायचा तो पदार्थ- उदा. साबूदाणा, खसखस, बदाम यातले काहीही) घालतात. त्यावर साखरेचा एक-एक टी-स्पून गोळीबंद पाक घालून हाताने तो पसवला जातो. सर्व जिन्नसाला पाकाचे आवरण देत ही प्रक्रिया पुन:पुन्हा केली जाते. त्यात पुन्हा हलव्याला चांगला काटा येणे गरजेचे. शिवाय पावसाळा संपल्याशिवाय हलवा बनवायला घेता येत नाही. त्यामुळे त्याआधी वर्षभर पाटणकरांकडे हलव्याच्या दागिन्यांचे ‘बेस’ बनवण्याचे काम सुरू असते आणि हलवा बनू लागला की दागिने तयार करण्यास सुरुवात होते. हलव्याच्या दागिन्यांमधील वैविध्य हे पाटणकरांनी आपले कायमचे वैशिष्टय़ ठेवले. दोन वर्षांपूर्वी ‘रमा-माधव’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी हलव्याचे ‘रमा-माधव’ दागिने आणले. पेशवाई काळातील दागिन्यांचा अभ्यास करून पुतळ्यांचे मंगळसूत्र, पायातील मासोळ्या, पैंजण, केसांच्या खोप्यात घालायचे अलंकार हे त्यांनी हलव्यात बनवले. त्यानंतर आलेल्या ‘जय मल्हार’ हलव्यांच्या दागिन्यांनीही उत्तम प्रतिसाद मिळवला. अगदी लहान बाळाला घालण्याची हलव्याची पगडी, फेटय़ापर्यंतचे वैविध्य त्यांनी आणले. काही हौशी ग्राहकांनी बाळासाठी बाराबंदी पोशाख हलव्यांनी सजवलेला बनवून नेल्याचेही सोनिया पाटणकर सांगतात. हलव्यांच्या दागिन्यांचे फोटो काढून पाठवण्याची स्पर्धा, हलव्याच्या दागिन्यांचा ‘फॅशन शो’ अशा आकर्षक उपक्रमांचा पाटणकरांनी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग करून घेतला. त्याचीही सुरुवात १९९९ मध्ये ग्राहकांपासूनच झाली होती. एका हौशी बाईंनी आपल्या दोन सुनांसाठी हलव्याचे दागिने नेले होते. त्यांनी सुनांचे फोटो काढून कौतुकाने पाटणकर खाऊवाल्यांना पाठवले. तरुण जोडपी, लहान बाळांना हलव्याचे दागिने घालून काढलेले फोटो ‘मॉडेल’ फोटोंपेक्षा नैसर्गिक वाटत होते. मग त्याची स्पर्धा आणि त्या निमित्ताने ग्राहकांचे ‘गेट टुगेदर’ सुरू झाले. पाटणकरांच्या इतर उत्पादनांप्रमाणेच हलव्यांचे दागिनेही फक्त पुण्यातल्याच ग्राहकांपुरते राहिले नाहीत. २०१० मध्ये पाटणकरांनी आपले संकेतस्थळ सुरू केले आणि त्यातून उत्पादने राज्याबाहेर आणि अगदी देशाबाहेरही जाऊ लागली. आताही अमेरिका, युरोप, चीन, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या मराठी भाषकांकडून त्यांच्या हलव्यांच्या दागिन्यांना मागणी येते आणि हे दागिने तिथे पुरवले जातात. हलव्यांचे दागिने ही खरे तर पाटणकरांच्या अनेक उत्पादनांपैकी एक गोष्ट. पण तीच त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ बनली आहे. आपला वेगळेपणा जपत हे दागिने पुन्हा ‘फॅशन’मध्ये आणल्याचे आणि सातासमुद्रापार पोहोचवण्याचे श्रेय या पुणेरी ‘बँड्र’ला नक्कीच द्यायला हवे!
sampada.sovani@expressindia.com