पुणे : गिरिप्रेमी संस्थेचे गिर्यारोहक आणि संस्थेच्या महत्त्वाकांक्षी ‘माऊंट मेरू’ मोहिमेतील सदस्य पवन हाडोळे आणि वरुण भागवत यांनी हिमाचल प्रदेशमधील ‘स्पिती व्हॅली’ येथील ‘आइस क्लाइंबिंग’चा आव्हानात्मक अभ्यासक्रम नुकताच पूर्ण केला आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये हिमालयात जसे तापमान कमी होत जाते, तसे तिथे नैसर्गिक बर्फाचे कडे तयार होण्यास सुरुवात होते. या हिमकड्यांवर दरवर्षी डिसेंबर, जानेवारी महिन्यात ’आइस क्लाइंबिंग‘चे प्रशिक्षण दिले जाते. उणे १५ ते २० तापमानात, जाड थरांचे कपडे, जॅकेट्स, क्रॅपोन्स (बुटांखाली लावण्यात येणारे लोखंडी टोकदार आवरण), आइस ॲक्स, आइस पिटाॅन्स (बर्फामध्ये अँकर करण्यासाठी वापरले जाणारे खिळे), क्विक ड्रॉ असे तांत्रिक आरोहणाचे साहित्य वापरून ८० ते ९० अंशाच्या खड्या हिमकड्यावर तांत्रिक चढाईचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण आत्मसात करणे आणि ते पुढील मोहिमेत वापरण्यासाठी या गिर्यारोहकांना आपले शारीरिक श्रम, जिद्द, मेहनत, चिकाटी आणि संपूर्ण कौशल्य पणाला लावावे लागते. या प्रशिक्षणादरम्यान या गिर्यारोहकांना नवीन तंत्र शिकण्यास मिळतात.

हेही वाचा – शेतजमीन, वहिवाटीचे वाद मिटवा केवळ दोन हजार रुपयांत, शासनाची सलोखा योजना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गिरिप्रेमी संस्थेतर्फे यावर्षी मे महिन्यात उत्तराखंड मधील ‘माऊंट मेरू’ या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या अष्टहजारी हिमशिखरावर मोहीम आखली आहे. या मोहिमेसाठीची संस्थेच्या गिर्यारोहकांची तयारी मागील वर्षापासूनच सुरू झाली आहे. आता जसजशी चढाई जवळ येत आहे, तशी तयारीही वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून या संघातील दोन गिर्यारोहकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणाचा तांत्रिक दृष्ट्या अत्यंत अवघड अशा मेरू शिखर चढाई करणाऱ्या गिरिप्रेमी संघाला नक्कीच फायदा होणार असल्याचे ज्येष्ठ गिर्यारोहक आणि गिरिप्रेमीच्या ‘माऊंट मेरू’ मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी सांगतिले.